नवी दिल्ली – भारत आणि रशियाच्या नौदलांनी आज अरबी समुद्रात युद्धनौकांचा पासिंग एक्सरसाईज केला. या उपक्रमात भारताने स्वदेशी तंत्राने बनवलेली आयएनएस कोची ही युद्धनौका उतरवली होती.
या युद्धनौकेवर गाईडेड मिसाईल्स तैनात करण्यात आली आहेत. रशियाची ऍडमिरल ट्रिब्युट्स ही विनाशिका या उपक्रमात सहभागी झाली होती. दोन नौदलातील समन्वय आणि कार्यक्षमता याची सिद्धता दाखवण्यासाठी हा उपक्रम घेण्यात आला.
यात क्रॉस डेक हेलिकॉप्टर ऑपरेशनसह अन्य प्रात्यक्षिके घेण्यात आली. कोणतीही आपत्ती उद्भवल्यास किंवा युद्धजन्य स्थिती निर्माण झाल्यास दोन्ही नौदलांमध्ये सहजपणे समन्वयाने त्यावर उपाययोजना व्हावी त्याचा सराव यानिमीत्ताने घेण्यात आला. भारत आणि रशियातील वाढत्या नौदल सहकार्याचे हे निदर्शक मानले जात आहे.