Indirect Tax Collection : जागतिक व्यापार युद्ध आणि भूराजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय अर्थव्यवस्था मात्र चांगली कामगिरी करीत असल्याची लक्षणे दिसून येत आहेत. 2025- 26 या आर्थिक वर्षात भारतात झालेले अप्रत्यक्ष कर संकलन उद्दिष्टापेक्षा काही प्रमाणात जास्त झाल्याची आकडेवारी अप्रत्यक्ष कर विभागाच्या अधिकार्यांनी जारी केली आहे. अधिकार्यानी दिलेल्या माहितीनुसार एकूण अप्रत्यक्ष कर संकलन आर्थिक वर्ष 2026 मध्ये सुधारित उद्दिष्टापेक्षा काही प्रमाणात वाढून 15.52 लाख कोटी रुपये इतके झाले आहे. यामध्ये सीमा शुल्क, उत्पादन शुल्क आणि सीजीएसटीचा समावेश आहे. सीमा शुल्कातून 2.58 लाख कोटी रुपये, उत्पादन शुल्कातून 3.38 लाख कोटी आणि सीजीएसटीमधून 9.58 लाख कोटी रुपये मिळाल्याचे सरकारने सांगितले. सीजीएसटी म्हणजे सेंट्रल जीएसटी ज्यामध्ये एकूण जीएसटीतील केंद्र सरकारचा वाटा असतो. जास्त आकडेवारीचा तपशील न देता अधिकार्यांनी सांगितले की, सीमाशुल्क संकलन सुधारित उद्दिष्टाच्या 102%, उत्पादन शुल्क संकलन उद्दिष्टाच्या 101% तर सेंट्रल जीएसटी संकलन उद्दिष्टाच्या 100.8 टक्के इतके झाले आहे. म्हणजे प्रत्येक पातळीवर सुधारित उद्दिष्टापेक्षा जास्त रक्कम संकलित झाली आहे. याबद्दल अधिकार्यांनी समाधान व्यक्त केले. एकूण जीएसटी आणि बिगर जीएसटी संकलन उद्दिष्टाच्या 101.2% झाले असल्याचे अधिकार्यांनी स्पष्ट केले. असे असले तरी पान मसाल्यावर लावण्यात आलेल्या आरोग्य अधिभाराचे संकलन उद्दिष्टापेक्षा कमी झाले. या अधिभारातून सरकारला 2,330 कोटी रुपयांची अपेक्षा होती. मात्र यापेक्षा कर संकलन 37% कमी झाले आहे. एक फेब्रुवारी 2026 पासून पान मसाल्यावर आरोग्य अधिभार लावण्यात आलेला होता. हा अधिभार 40% जीएसटीपेक्षा जास्त आहे. म्हणजे पान मसाल्याची विक्री महाग असल्याच्या कारणामुळे एक तर कमी झाली आहे किंवा पान मसाल्याची चोरून विक्री केली जात असल्याचे दिसून येते. हे कर संकलन वाढविण्यासाठी काय उपाययोजना करता येतील याबाबत अधिकार्यांनी स्पष्टीकरण दिले नाही. चालू आर्थिक वर्षांमध्ये आरोग्य अधिवारातून अर्थ मंत्रालयाला 14 हजार कोटी रुपयांची अपेक्षा आहे. जीएसटी दर कपातीचा परिणाम नाही – सप्टेंबर महिन्यात जीएसटी परिषदेने 375 वस्तूवरील जीएसटीचा दर कमी केला होता. कराचे टप्पे पाच वरून दोन इतके केले होते. याचा फक्त तीन महिने जीएसटी संकलनावर परिणाम झाला. मात्र नंतर जीएसटी संकलन वेगाने वाढत असल्याचे दिसून येत आहे. वार्षिक जीएसटी संकलनावर या घडामोडीचा फारसा नकारात्मक परिणाम झालेला नाही.