नाकावर दगड लागूनही इंदिराजींनी भाषण थांबवले नाही 

ही घटना आहे 1967 च्या लोकसभा निवडणुकांमधील. लाल बहाद्दूर शास्त्रींच्या निधनानंतर पंतप्रधान बनलेल्या इंदिरा गांधींच्या नेतृत्त्वाखाली देशभरात सार्वत्रिक निवडणुका होत होत्या. याच काळात इंदिराजींना गुंगी गुडियासारख्या उपमा देऊन संबोधले जात होते. विशेष म्हणजे असे असूनही त्या जिथे जातील तिथे त्यांना ऐकण्यासाठी लोकांची अमाप गर्दी होत होती. अशाच एका प्रचारसभेसाठी इंदिरा गांधी ओडिशामध्ये पोहोचल्या होत्या. ओडिशाची राजधानी भुवनेश्‍वरमध्ये त्यांची सभा होती.

त्यावेळी ओडिशा हे राज्य स्वतंत्र पार्टीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा. इंदिरा गांधींनी भाषणासाठी बोलण्यास सुरुवात केल्याबरोबर काही उपद्रवी व्यक्‍तींनी विरोधात घोषणाबाजी सुरू केली. त्याचबरोबर काहींनी दगडफेक करण्यास सुरुवात केली. स्थानिक नेत्यांनी ते पाहून इंदिराजींना तत्काळ भाषण संपवण्याची विनंती केली; परंतु त्या थांबायला तयार नव्हत्या. उलट त्यांनी गर्दीला संबोधून प्रश्‍न विचारला की, तुम्ही अशाच प्रकारे देश चालवणार आहात का? दुसरीकडे उपस्थित समुदायालाही विचारले की तुम्ही अशा लोकांना मते देणार आहात का?

यादरम्यान एक दगड इंदिराजींच्या नाकावर लागला आणि नाकातून रक्‍त येऊ लागले. त्यांचे नाकाचे हाड तुटले होते. असे असूनही त्यांनी बोलणे सुरूच ठेवले. ओडिशानंतर इंदिराजींची कोलकात्याला सभा होती. दिल्लीला पोहोचल्यानंतर त्यांच्या नाकावर शस्रक्रिया करावी लागली. शस्रक्रियेनंतर किती तरी दिवस त्या नाकावर पट्टी बांधून प्रचार करत होत्या.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.