Nagpur Winter Session 2025 | इंडिगो एअरलाईन्सच्या सेवा विस्कळीत झाल्याने त्याचा मोठा मनस्ताप प्रवाशांना सहन करावा लागत आहे. इंडिगोच्या गोंधळाचा मोठा फटका हिवाळी अधिवेशनालाही बसला आहे. या विस्कळीत सेवेमुळे अधिवेशनात सहभागी होणारे मंत्री, आमदार, अधिकारी तसेच विविध कारणांसाठी नागपूरकडे येणारे सामान्य नागरिक यांच्यावर थेट परिणाम झाला आहे. अधिवेशन सोमवार, ८ डिसेंबरपासून सुरू होत असल्याने रविवारी नागपूरमध्ये पोहोचणे आवश्यक होते. मुंबई – नागपूर आणि पुणे – नागपूर या महत्त्वाच्या मार्गावर उडाणे वारंवार रद्द होत असल्याने व तासंतास होत असलेल्या विलंबामुळे प्रवाशांसोबत आता मंत्री, आमदार अधिकारी यांनासुद्धा यांच्या परिणाम जाणवत आहे. तिकीट बुक करण्यासाठी प्रवाशांची गर्दी मुंबई आणि पुण्याहून येणारी अनेक उड्डाणे ऐनवेळी रद्द झाल्याने प्रवास नियोजन बिघडले. याचा फटका आता मंत्री, आमदार, अधिकाऱ्यांना सुद्धा बसला आहे. इतर एअरलाईन्सच्या तिकिटांसाठी अचानक वाढलेल्या मागणीमुळे तातडीने तिकीट बुक करण्यासाठी प्रवाशांची गर्दी झाली. याबाबत विधिमंडळ सचिवालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, मंत्री आणि सचिवालयातील अधिकारी वेळेत पोहोचतील असे नियोजन करण्यात आले आहे. मात्र, इंडिगोच्या सेवेत निर्माण झालेल्या गोंधळामुळे प्रवासाचा खर्च निश्चितच वाढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पर्यायी मार्ग अनेक आमदार व मंत्री समृद्धी महामार्गाच्या पर्याय स्वीकारून नागपुरात पोहोचतील आणि अधिवेशनात सहभागी होतील. काही आमदारांनी समृद्धी मार्गे नागपूरला जाण्याचा निर्णय घेतला आहे. तर काहींनी रेल्वेद्वारे जाण्याचे नियोजन केल्याचे समजते. तर काही मंत्री चार्टर विमानाने येणार असल्याचे समजत आहे. इंडिगो संकटाचा गैरफायदा घेऊन इतर कंपन्यांनी भाडे वाढवून प्रवाशांना वेठीस धरले होते. पीटीआयच्या वृत्तानुसार, ६ डिसेंबर रोजी कोलकाता-मुंबई मार्गावर स्पाइसजेटच्या इकॉनॉमी क्लासचे तिकीट ९०,००० रुपये, तर एअर इंडियाच्या मुंबई-भुवनेश्वर तिकीटाचा दर ८४,४८५ रुपयांपर्यंत पोहोचला होता. यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप होता. नागरी उड्डयन मंत्रालयाने आज दुपारपासूनच सर्व एअरलाईन्सवर हे ‘फेअर कॅप’ लागू केले असून, कंपन्यांना त्यांच्या मर्जीनुसार भाडे वाढवता येणार नाही. हेही वाचा: गोव्यातील नाईट क्लबमध्ये भीषण आग ! २५ जणांचा मृत्यू ; घटनेचा भयानक व्हिडिओ समोर