IndiGo flight operations crisis: देशातील सर्वात मोठी विमान कंपनी असलेल्या ‘इंडिगो’ला (IndiGo) सध्या गंभीर परिचालन (Operations) संकटाचा सामना करावा लागत आहे. गेल्या चार दिवसांत पुणे, मुंबई, दिल्ली, बंगळुरू आणि हैदराबादसह देशातील प्रमुख विमानतळांवरून 1000 हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आल्याने हजारो प्रवाशांचे हाल झाले आहेत. नेमके काय घडले? या अभूतपूर्व संकटाचे मुख्य कारण ‘नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाचे’ (DGCA) नवीन ‘फ्लाइट ड्युटी टाइम लिमिटेशन’ (FDTL) नियम हे आहे. या नवीन नियमांनुसार, वैमानिकांच्या (pilots) कामाच्या तासांवर मर्यादा आली असून त्यांच्या विश्रांतीचा कालावधी वाढवण्यात आला आहे. तसेच रात्रीच्या उड्डाणांवरही कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. एकीकडे इंडिगोने आपल्या उड्डाणांचे हिवाळी वेळापत्रक (Winter Schedule) वाढवले होते, तर दुसरीकडे नवीन नियमांमुळे मोठ्या संख्येने वैमानिक अनिवार्य विश्रांतीवर गेले. यामुळे नियोजनाचा पूर्ण बोजवारा उडाला. केवळ नवीन नियमच नाही, तर इतरही अनेक कारणांनी परिस्थिती बिघडली आहे. त्यामध्ये A320 विमानांशी संबंधित सॉफ्टवेअर ॲडव्हायझरी आणि मध्यरात्रीपर्यंत वाढणारा उड्डाणांचा विलंब. इंडिगो दररोज २,२०० हून अधिक उड्डाणे संचालित करते. अशा मोठ्या नेटवर्कमध्ये एका छोट्या समस्येचा परिणाम साखळी अभिक्रियेप्रमाणे (Chain Reaction) होऊन शेकडो उड्डाणे रद्द करावी लागली. याचाही त्यात समावेश आहे. व्यवस्थापनावर गंभीर आरोप – जरी DGCA ने रोस्टरिंगमधील एक नियम मागे घेऊन तात्पुरता दिलासा दिला असला, तरी वैमानिक संघटनांनी या गोंधळासाठी इंडिगो व्यवस्थापनालाच जबाबदार धरले आहे. “खराब नियोजन, कर्मचाऱ्यांची कमतरता (Understaffing), थांबलेली भरती प्रक्रिया आणि नवीन नियमांकडे केलेले दुर्लक्ष,” असे गंभीर आरोप व्यवस्थापनावर करण्यात आले आहेत. दुसरीकडे, संसदेतही या विषयावर चिंता व्यक्त करण्यात आली असून, केंद्र सरकारने प्रवाशांना रिफंड देणे आणि सुधारात्मक पावले उचलण्याचे निर्देश एअरलाईन्सला दिले आहेत. इंडिगो विमान संकट: ठळक घडामोडी विमाने रद्द: गेल्या ४ दिवसांत १,००० हून अधिक उड्डाणे रद्द झाल्याने देशभरात गोंधळ. मुख्य कारण: DGCA चे नवीन FDTL नियम, ज्यामध्ये वैमानिकांसाठी सक्तीची विश्रांती आणि ८ तासांची ‘नाइट फ्लाइंग’ मर्यादा समाविष्ट आहे. नवीन नियमांचा परिणाम: आठवड्यात ४८ तास विश्रांती आणि आठवड्यात केवळ २ रात्रीचे लँडिंग अनिवार्य केल्याने वैमानिकांची उपलब्धता कमी झाली. प्रवाशांचे हाल: विमानतळावर १०-१२ तास ताटकळत राहणे, मर्यादित मदत आणि वारंवार बदलणारे वेळापत्रक यामुळे प्रवासी त्रस्त. व्यवस्थापनाची चूक: वैमानिक उपलब्धतेची खात्री न करताच विंटर शेड्यूल मंजूर केल्याने DGCA आणि एअरलाईन व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह. एकाधिकारशाहीची भीती: देशातील ६३% बाजार हिस्सा इंडिगोकडे असल्याने, त्यांच्या या संकटामुळे विमान क्षेत्रातील एकाधिकारशाही (Monopoly) बाबत चिंता व्यक्त होत आहे. नवीन FDTL नियम: वैमानिकांच्या कामाच्या वेळा कशा बदलल्या? FDTL म्हणजे ‘विमान उड्डाण कर्तव्य वेळेची मर्यादा’. हे नियम DGCA (नागरी विमान वाहतूक महासंचालनालय) लागू करते आणि यांचा मुख्य उद्देश एकच आहे: प्रवाशांची सुरक्षितता. वैमानिक जर थकलेले असतील, तर त्यांच्याकडून उड्डाण करताना चुका होण्याची शक्यता असते, म्हणून या नियमांमुळे वैमानिकांच्या कामावर आणि आरामावर कडक निर्बंध येतात. या नवीन नियमांमधील प्रमुख तीन बदल खालीलप्रमाणे आहेत, ज्यामुळे इंडिगोला वैमानिकांची कमतरता भासली. १. साप्ताहिक विश्रांतीची सक्ती वाढली – जुने नियम वैमानिकांना दर आठवड्याला तुलनेने कमी आराम करण्याची परवानगी देत होते. परंतु, नवीन नियमांनुसार, वैमानिकांना प्रत्येक सात दिवसांच्या कालावधीत सलग ४८ तास (दोन पूर्ण दिवस) विश्रांती घेणे अनिवार्य करण्यात आले आहे. परिणामी आधी कंपनी ज्या वैमानिकांकडून आठवड्यात जास्त काम करून घेऊ शकत होती, त्यांना आता नियमानुसार दोन दिवस काम थांबवावे लागले. यामुळे, एकाच वेळी मोठ्या संख्येने वैमानिक ‘अनिवार्य सुट्टी’वर (Mandatory Rest) गेले. २. रात्रीच्या उड्डाणाचे तास कमी केले – रात्रीच्या वेळी काम केल्यामुळे थकवा लवकर येतो. हे लक्षात घेऊन, नवीन नियमांमध्ये रात्रीच्या वेळी वैमानिकांना विमान उड्डाणाची परवानगी असलेल्या तासांवर मोठी कपात करण्यात आली. रात्रीची ड्युटी (रात्री १२ ते पहाटे ५ पर्यंत) असलेल्या वैमानिकांसाठी कामाचे तास कमी करण्यात आले. तसेच, एका आठवड्यात वैमानिक किती रात्री लँडिंग करू शकतात, यावरही संख्यात्मक बंधन (फक्त दोन रात्रीची मर्यादा) घालण्यात आले. परिणामी रात्रीच्या उड्डाणांचे वेळापत्रक असलेले वैमानिक पूर्वीपेक्षा लवकर ‘आराम मोड’मध्ये (Rest Mode) गेले. यामुळे रात्रीच्या वेळी उड्डाण करण्यासाठी उपलब्ध वैमानिकांची संख्या खूप कमी झाली. ३. ड्युटी-पूर्वीची विश्रांती वाढली – विमानाचे उड्डाण सुरू करण्यापूर्वी वैमानिकाला किती तास आराम करणे आवश्यक आहे, हा कालावधीही वाढवण्यात आला. ड्युटी सुरू करण्यापूर्वी वैमानिकांनी किमान १२ तास (किंवा त्याहून अधिक) विश्रांती घेतली आहे, याची खात्री कंपनीला करावी लागते. परिणामी एका ड्युटीनंतर दुसऱ्या ड्युटीसाठी वैमानिक उपलब्ध होण्यासाठी लागणारा वेळ वाढला. उदाहरणार्थ, जर एखादे उड्डाण रात्री उशिरापर्यंत लांबले (विलंब झाला), तर तो वैमानिक दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर कामावर हजर होऊ शकत नाही. त्याला नियमांनुसार पूर्ण विश्रांती घ्यावीच लागते. इंडिगोच्या संकटाचे मुख्य कारण: इंडिगोचे परिचालन संकट या तिन्ही नियमांचा एकत्रित परिणाम आहे. इंडिगो ही दररोज २२०० हून अधिक उड्डाणे चालवणारी देशातील सर्वात मोठी विमान कंपनी आहे. कंपनीने नवीन नियमांची अंमलबजावणी होण्यापूर्वीच, आपल्या उड्डाणांची संख्या (हिवाळी वेळापत्रकात) वाढवली होती. परंतु, नियमांनुसार लागणाऱ्या अतिरिक्त वैमानिकांची भरती वेळेत केली नाही. त्यामुळे, जेव्हा DGCA चे नवीन कडक नियम लागू झाले, तेव्हा जास्त विश्रांती घेणारे वैमानिक, रात्रीची मर्यादा पूर्ण झालेले वैमानिक, साप्ताहिक सुट्टीवर असलेले वैमानिक, …असे एकाच वेळी मोठ्या संख्येने वैमानिक ‘ड्युटी’साठी उपलब्ध झाले नाहीत. यामुळे विमाने उडवण्यासाठी पायलटच शिल्लक राहिले नाहीत आणि कंपनीला नाइलाजाने शेकडो उड्डाणे रद्द करावी लागली, परिणामी ‘परिचालन संकट’ निर्माण झाले.