IndiGo flight : पाकच्या हवाई हद्दीत भरकटले इंडिगोचे विमान

अमृतसर :- इंडिगोचे श्रीनगर-जम्मू फ्लाइट क्रमांक-6ई-2124 खराब हवामानामुळे रविवारी पाकिस्तानच्या हवाई हद्दीत घुसले होते. इंडिगो एअरलाइन्सचे विमान दुसऱ्यांदा पाक हद्दीत दाखल झाल्याने खळबळ उडाली. यानंतर विमानाचे अमृतसरमध्ये इमर्जन्सी लॅंडिंग करण्यात आले. दोन आठवड्यांपूर्वीही इंडिगो एअर लाईन्सचेच विमान पाकिस्तानच्या हवाई हद्दीत गेले होते.
विमानतळावरून मिळालेल्या माहितीनुसार, इंडिगो विमानाने रविवारी दुपारी 3.36 वाजता श्रीनगरहून जम्मूसाठी उड्डाण केले. 28 मिनिटांनंतर, खराब हवामानामुळे विमान जम्मू-काश्मीरमधून कोट जमालमार्गे पाकिस्तानात दाखल झाले. हे विमान सुमारे पाच मिनिटे पाकिस्तानच्या हवाई हद्दीत राहिले आणि सियालकोटमार्गे जम्मूच्या दिशेने आले.
जम्मूमध्येही खराब हवामान होते. त्यामुळे विमान तेथेही उतरू शकले नाही. यानंतर विमान अमृतसरला रवाना झाले. दुपारी 4.15 च्या सुमारास हे विमान पुन्हा पाकिस्तानच्या हद्दीत घुसले. जम्मूतील कडियाल कलान येथून दाखल झालेले हे विमान अमृतसरमधील अजनाला येथील कक्कर गावातून दुपारी 4.25 वाजता भारतीय हद्दीत परतले.
विमानतळ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, इंडिगो विमान पाकिस्तानी हवाई हद्दीत प्रवेश करण्यापूर्वी दोन्ही देशांच्या संबंधित अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली होती. जम्मू आणि लाहोरच्या देखरेखीखाली हे उड्डाण वळवण्यात आले. इंडिगो विमानाने लॅंडिंगपूर्वी 9 वेळा अमृतसर विमानतळावर चक्कर मारली. यानंतर विमानाला उतरण्याची परवानगी देण्यात आली.




