Indigo Flight Crisis: इंडिगोच्या अडचणी वाढल्या! सरकारचा मोठा निर्णय; 10% उड्डाणे कपात करण्याचे आदेश

Indigo Flight Crisis: देशातील सर्वात मोठी विमान कंपनी असलेल्या इंडिगोच्या (Indigo) फ्लाईट्सच्या गोंधळावर केंद्र सरकारने कठोर भूमिका घेतली आहे. सलग आठव्या दिवशी इंडिगोची सेवा विस्कळीत झाल्यानंतर, नागरी उड्डाण मंत्रालयाने (Civil Aviation Ministry) मंगळवारी उच्चस्तरीय बैठकीत इंडिगोच्या १० टक्के विमानांच्या उड्डाणांमध्ये कपात करण्याचे निर्देश दिले.
गेले आठ दिवस इंडिगोच्या विमानांच्या रद्द होण्याचे सत्र सुरूच असून, आज आठव्या दिवशी ४०० हून अधिक फ्लाईट्स रद्द झाल्या. यात सर्वाधिक फटका बंगळूरू येथून जाणाऱ्या विमानांना बसला आहे. या एका महिन्यात इंडिगोच्या ४,५०० हून अधिक फ्लाईट्स रद्द झाल्या आहेत, ज्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल झाले आहेत.
महत्त्वाच्या मार्गांवर कपातीचे निर्देश –
नागरी उड्डाण मंत्रालयाने ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर या कारवाईची माहिती दिली. निर्देशानुसार, जास्त मागणी आणि उच्च वारंवारता असलेल्या मार्गांवरील विमानांमध्ये ही १० टक्के कपात लागू होईल. इंडिगोच्या दैनंदिन २,३०० फ्लाईट्सवर याचा परिणाम होणार असून, सुमारे २३० उड्डाणे कमी होतील.
मंत्रालयाने इंडिगोला प्रवाशांना त्यांचा परतावा (Refund) आणि सामान (Luggage) तातडीने परत करण्याचेही निर्देश दिले आहेत. इंडिगोच्या मार्गांमध्ये कपात करणे आवश्यक असल्याचेही मंत्रालयाने स्पष्ट केले.
During the last week, many passengers faced severe inconvenience due to Indigo’s internal mismanagement of crew rosters, flight schedules and inadequate communication. While the enquiry and necessary actions are underway, another meeting with Indigo’s top management was held to… pic.twitter.com/yw9jt3dtLR
— Ram Mohan Naidu Kinjarapu (@RamMNK) December 9, 2025
सीईओने घेतली मंत्र्यांची भेट –
संकटाच्या पार्श्वभूमीवर इंडिगोचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) पीटर एल्बर्स यांनी नागरी उड्डाण मंत्री राम मोहन नायडू यांची भेट घेतली. भेटीदरम्यान इंडिगोचे सीईओ पीटर एल्बर्स हात जोडून उभे असल्याचे दिसून आले. इंडिगोला उद्या, बुधवार, संध्याकाळी ५ वाजेपर्यंत, नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाकडे (DGCA) सुधारित वेळापत्रक सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
१० विमानतळांवर वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती –
प्रवाशांना येत असलेल्या अडचणींची चौकशी करण्यासाठी केंद्राने मुंबई, बंगळूरू, हैदराबाद, कोलकाता, चेन्नई, अहमदाबाद, पुणे, गुवाहाटी, गोवा आणि तिरुवनंतपुरम या १० मोठ्या विमानतळांवर उपसचिव, संचालक आणि सहसचिव स्तरावरील वरिष्ठ अधिकारी तैनात केले आहेत. हे अधिकारी प्रवाशांच्या समस्यांचा आढावा घेतील.
‘ऑपरेशन पूर्ववत झाले आहे’ – इंडिगो सीईओ
दुसरीकडे, इंडिगोचे सीईओ पीटर एल्बर्स यांनी इंडिगो पुन्हा रुळावर आल्याचे आणि ऑपरेशन स्थिर झाल्याचे म्हटले आहे. “लाखो ग्राहकांना त्यांचा संपूर्ण परतावा मिळाला आहे. आम्ही दररोज हे करत आहोत. आम्ही आमच्या नेटवर्कमधील १३८ ठिकाणांवर परत आलो आहोत आणि सरकारला सहकार्य करत आहोत,” असे एल्बर्स यांनी सांगितले.


