Pimpri : डुडूळगाव येथे देशी वृक्ष लागवड मोहिमेस सुरुवात

पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिका, वन विभाग पुणे व वेदव्यास प्रतिष्ठान पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपरी चिंचवड शहरात एक लाख देशी वृक्षांची लागवड करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या उपक्रमात पहिल्या टप्प्यात ५० हजार देशी वृक्ष लागवड करण्यात येणार असून या मोहिमेचा प्रारंभ नुकताच डुडूळगाव येथे महर्षि वेदव्यास प्रतिष्ठानचे अध्यक्ष प.पू. स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज आणि महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते झाला.
याप्रसंगी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, वन विभागाचे उपवनसंरक्षक महादेव मोहिते, वनपरिक्षेत्र अधिकारी सुरेश वरक, महापालिकेचे मुख्य उद्यान अधीक्षक महेश गारगोटे, उद्यान अधीक्षक योगेश वाळुंज, उप उद्यान अधीक्षक राजेंद्र वसावे आदी उपस्थित होते. दरम्यान, डुडूळगाव येथील मोहिमेमध्ये निसर्गाशी सुसंगत वाढणारे वड, पिंपळ, आंबा, जांभूळ, चिंच, कडुनिंब, बहावा, पळस, उंबर, आवळा, साग, करवंद, शेवगा, जास्वंद, काटेसावर, बेल, अर्जुन, सिरिस, पांगारा, कांचन, हिजळ, पन्हाळ, खैर, शेवती, तामण, सोनचाफा, पारिजात, मोरिंगा, पांगळी, करवंद काटेरी, सावर, कडंब अशा विविध वृक्षांचे रोपण करण्यात येणार आहे. हे सर्व वृक्ष स्थानिक हवामान व मातीला अनुरूप आहेत.
देशी वृक्ष लागवड मोहिमेच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड महापालिका, वन विभाग आणि वेदव्यास प्रतिष्ठान यांनी संयुक्तपणे हरित उपक्रमाची पायाभरणी केली आहे. या मोहिमेतून भविष्यातही मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करून नागरिकांसाठी आरोग्यदायी वातावरण निर्माण होण्यास मदत होईल.
– महेश गारगोटे, मुख्य उद्यान अधीक्षक, पिंपरी चिंचवड महापालिका





