लंघेसमर्थकांत फुलले आशेचे “किरण’!

राजेंद्र वाघमारे
नेवासा – राजकारणात कधी कोणाची वर्णी लागेल? याचा काही नेम नसतो. ऐनवेळी चाणक्यनिती कोणाच्या बाजूने कधी कौल देईल? हेसुद्धा कोणाला काही सांगता येत नसते. मात्र, महसूलमंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नेवासा दौऱ्यात आल्यानंतर एका कार्यक्रमात जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव लंघे यांना भविष्य काळात चांगले दिवस येतील, असे सूचक विधान केल्यामुळे लंघे समर्थकांमध्ये नवचैतन्य पसरून आनंदाची लाट निर्माण झाली आहे. मंत्री विखे पाटील यांच्या सूचक वक्तव्यामुळे राजकारणातील जाणकारांच्या भुवया उंचावल्या आहेत.
राज्यात शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर आल्यानंतर पुन्हा एकदा तालुक्यात भाजपच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांना राजकीय “बळ’ मिळत असल्याचे दिसून येत आहे. शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या पहिल्याच टप्प्यात भाजपचे नेते आ. विखे पाटील यांची महसूलमंत्रिपदी वर्णी लागली.
त्यानंतर जिल्ह्याचे पालकमंत्रिपदही ताब्यात आल्यानंतर मंत्री विखे पाटील यांनी जिल्ह्यातील आपल्या समर्थकांसह भाजपच्या पदाधिकाऱ्यांना राजकीय ताकद देण्याबरोबरच जिल्हा प्रशासनावर चांगलाच “वचक’ आणि दरारा निर्माण केला.
प्रशासनावर चांगलीच मजबूत पकड साधत महसूलमंत्री विखे पाटील जिल्हा दौऱ्याच्या ताफ्यात जिल्हाधिकाऱ्यांसह विविध खात्यांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित ठेवत असल्यामुळे जागेवरच विविध विषयांच्या समस्यांचा निपटारा होत असल्यामुळे जनतेतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.महसूलमंत्री विखे यांच्या या कामाचे नागरिकांमधून कौतुक आहे.
राजकीय हालचालींवर लक्ष!
नेवासा विधानसभा मतदारसंघात भाजपचे माजी आ. मुरकुटे मैदानात उतरलेले आहेत. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विठ्ठलराव लंघेंनाही तालुक्यातून चांगला जनाधार मिळत आहे. मंत्री विखे पाटलांच्या शब्दावर विधानसभेची उमेदवारी या मतदारसंघात अवलंबून आहे. त्यातच नेवासा दौऱ्यात विखे यांनी राजकारणात लंघे यांना चांगले दिवस येतील, असे सूचक वक्तव्य केल्यामुळे लंघेसमर्थकांत चैतन्याची लाट पसरली असून, लंघेसमर्थक राजकीय हालचालींवर लक्ष ठेवून आहेत.





