मुंबई: नोव्हेंबर महिन्यात भारताचा बेरोजगारी दर (Unemployment Rate) ८ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर ४.७ टक्के इतकी खाली आला आहे. सरकारी आकडेवारीनुसार, ऑक्टोबरमध्ये हा दर ५.२ टक्के होता, त्यामुळे केवळ एका महिन्यात ०.५ टक्क्यांची लक्षणीय घट नोंदवली गेली आहे. नोकरीच्या स्थितीतील सुधारणा ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणावर झाली आहे. ग्रामीण बेरोजगारी दर ३.९ टक्क्यांवर आला आहे, जो एप्रिलनंतरचा सर्वात कमी आहे. तर शहरी बेरोजगारी दर देखील कमी होऊन ६.५ टक्के नोंदवण्यात आला आहे. कामकाजी लोकांच्या सहभागाचे प्रमाण (LFPR) देखील वाढले असून, १५ वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या लोकांसाठी ते ५५.८ टक्क्यांवर पोहोचले आहे. मात्र, या वाढीमध्ये ग्रामीण भागाचा मोठा वाटा असून शहरी भागातील LFPR ५ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर (५०.४ टक्के) पोहोचला आहे. रोजगार बाजारातील सुधारणेचे सर्वात मोठे कारण महिलांच्या वाढत्या सहभागाला दिले जात आहे. नोव्हेंबरमध्ये महिलांचा LFPR ३५.१ टक्क्यांवर पोहोचला आहे. महिलांच्या सक्रियतेमुळे पुरुष आणि महिलांच्या बेरोजगारी दरातील अंतरही कमी झाले आहे; पुरुषांमध्ये ४.६ टक्के तर महिलांमध्ये ४.८ टक्के बेरोजगारी दर नोंदवला गेला आहे. याशिवाय, युवकांमधील बेरोजगारी दर ऑक्टोबरमधील १४.९ टक्क्यांवरून १४.१ टक्क्यांवर आला आहे. रिझर्व्ह बँकेने तिसऱ्या तिमाहीत आर्थिक विकासाचा वेग मंदावण्याची शक्यता वर्तवली असताना, हा मजबूत रोजगार बाजार येणाऱ्या काळात अर्थव्यवस्थेसाठी मोठा आधार ठरू शकतो.