PM Modi UAE visit : पश्चिम आशियामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी शक्य असेल, ती सर्व मदत करण्यास भारत तयार आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. संयुक्त अरब अमिरातीच्या दौऱ्यामध्ये यूएईचे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांच्याबरोबरच्या चर्चेच्यावेळी पंतप्रधानांनी ही हमी दिली. विमानतळावर आगमन होताच यूएईचे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांनी पंतप्रधानांचे स्वागत केले. त्यावेळी पंतप्रधानांना औपचारिक मानवंदना देण्यात आली. दोन्ही नेत्यांमध्ये झालेल्या सविस्तर चर्चेदरम्यान पंतप्रधानांनी युएई वरील हल्ल्यांचा भारताकडून तीव्र निषेध नोंदवला, तसेच यूएईचे नेतृत्व आणि जनतेप्रति असलेल्या दृढ ऐक्याचा पुनरुच्चार केला. पंतप्रधानांनी होर्मुझच्या सामुद्रधुनीतून सुरक्षित प्रवास आणि अखंड वाहतूक करण्याच्या भारताच्या स्पष्ट भूमिकेचा पुनरुच्चार केला. दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय संबंधांच्या सर्व पैलूंचा आढावा घेतला आणि ऊर्जा, व्यापार, गुंतवणूक, संरक्षण, सुरक्षा, फिनटेक, पायाभूत सुविधा, शिक्षण, संस्कृती आणि लोकांमधील परस्पर संबंध यासह अनेक क्षेत्रांमध्ये सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी अधिक दृढ होत असल्याचे स्वागत केले. त्यांनी भारत-युएई सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी कराराच्या यशाची दखल घेतली. दोन्ही नेत्यांनी भारत आणि संयुक्त अरब अमिराती यांच्यातील चैतन्यपूर्ण आणि वृद्धिंगत होत असलेल्या द्विपक्षीय ऊर्जा भागीदारीची प्रशंसा केली, यामध्ये कच्च्या तेलाचा, तसेच एलएनजी आणि एलपीजी पुरवठ्याचा समावेश असून, भारताच्या ऊर्जा सुरक्षेमध्ये युएईने एक महत्वाचा भागीदार म्हणून आपली भूमिका कायम राखली आहे. सर्वसमावेशक ऊर्जा भागीदारीसाठी नवीन उपक्रमांना प्रोत्साहन देण्यावर दोन्ही नेत्यांनी सहमती दर्शवली. या संदर्भात, त्यांनी इंडियन स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्स लिमिटेड आणि अबू धाबी नॅशनल ऑइल कंपनी यांच्यातील धोरणात्मक सहकार्य कराराचे स्वागत केले. यामुळे भारताच्या धोरणात्मक पेट्रोलियम साठ्यामध्ये युएईचा सहभाग ३० दशलक्ष बॅरलपर्यंत वाढणार असून, भारतात धोरणात्मक वायू साठे उभारण्यासाठी दोन्ही देश एकत्रितपणे काम करतील. इंडियन ऑइल लिमिटेड कंपनी आणि अबुधाबी नॅशनल ऑइल कंपनी यांच्यात दीर्घकालीन एलपीजी पुरवठ्याबाबत झालेल्या कराराचेही त्यांनी स्वागत केले. युएईमधील कंपन्यांद्वारे भारतात ५ अब्ज अमेरिकन डॉलरची गुंतवणूक करण्याच्या घोषणेचे दोन्ही नेत्यांनी स्वागत केले. सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ म्हणून स्थिर आणि मजबूत द्विपक्षीय संरक्षण सहकार्याची दोन्ही नेत्यांनी दखल घेतली. धोरणात्मक संरक्षण भागीदारीच्या आराखड्यावर स्वाक्षरी या दौऱ्यादरम्यान दोन्ही देशांमध्ये धोरणात्मक संरक्षण भागीदारीच्या आराखड्यावर स्वाक्षरी झाली. याअंतर्गत, दोन्ही बाजूंनी संरक्षण क्षेत्रात औद्योगिक सहकार्य अधिक बळकट करणे, नवोन्मेष तसेच प्रगत तंत्रज्ञान क्षेत्रात सहयोग, प्रशिक्षण, संयुक्त सराव, सागरी सुरक्षा, सायबर संरक्षण, सुरक्षित दळणवळण आणि माहितीची देवाणघेवाण वाढवण्यावर सहमती दर्शवली. सागरी विकास निधी योजनेअंतर्गत, वडीनार येथे ऑफशोअर फॅब्रिकेशनसह जहाज दुरुस्ती क्लस्टर स्थापन करणे, जहाज दुरुस्तीमधील कौशल्य विकासाबाबत एक त्रिपक्षीय सामंजस्य करार. तसेच अमिरातीच्या भागीदारीने ८ एक्साफ्लॉप कॉम्प्युटर क्लस्टर स्थापन करण्याच्या करारावरही स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. याशिवाय सीमाशुल्क आणि बंदर प्राधिकरणांना जोडणाऱ्या व्हर्च्युअल ट्रेड कॉरिडोरची सुरुवातही करण्यात आली.