टेस्लासाठी भारताची वाट अवघड; जेएसडब्ल्यू समूहाचे सज्जन जिंदाल यांचे मत

नवी दिल्ली – टेस्लाचे प्रमुख ईलॉन मस्क भारतीय बाजारपेठेत प्रवेश करण्याची तयारी करीत आहेत. पण मी आलो मी जिंकलो असे काही त्यांच्या बाबतीत होणार नाही असे आपल्याला प्रामाणिकपणे वाटते. महिंद्रा अँड महिंद्रा आणि टाटा मोटर्स या कंपन्यांनी भारतात आपले स्थान निर्माण करण्यासाठी ज्या प्रकारचे परिश्रम केले आहेत अशा प्रकारचे परिश्रम टेस्ला कंपनी करू शकेल की नाही याबद्दल आपल्याला शंका आहेत असे जेएसडब्ल्यू उद्योग समूहाचे प्रमुख सज्जन जिंदाल यांना वाटते.
टेस्ला भारतात येणार आहे आणि या कंपनीला महिंद्रा आणि टाटा मोटर्सबरोबर स्पर्धा करावी लागणार आहे. ही स्पर्धा खडतर असेल. एका पुरस्कार वितरण समारंभात बोलताना जिंदाल म्हणाले की, मस्क भारतात नाहीत. ते अमेरिकेत आहेत. ते भारतात यशस्वी होऊ शकणार नाहीत. मस्क भारतीयांसाठी महिंद्रा आणि टाटा मोटर्सने जी उत्पादने विकसित केली आहेत तशी उत्पादने भारतीयांसाठी विकसित करू शकणार नाहीत.
मस्क अमेरिकन सरकारच्या माध्यमातून भारताने आयात शुल्क कमी करावे म्हणून दबाव आणत आहेत असे समजले जाते. मस्क यांनी भारतामध्ये शोरूम उघडण्याची तयारी पूर्ण केली आहे. या पार्श्वभूमीवर टेस्ला भारतात कितपत यशस्वी होईल या संदर्भात चर्चा चालू आहे.
काळच उत्तर देईल
मस्क स्मार्ट आहेत. ते बरेच उद्योजकीय राजकारण जाणतात. तसेच अवकाश यान निर्मिती करतात. त्यांनी चांगले काम केले आहे. मात्र भारतात यशस्वी होणे, ही एक वेगळी गोष्ट आहे. ती सहजासहजी शक्य नाही. हे मस्क यांना काळाच्या ओघात जाणवेल.





