* पंतप्रधान मोदींचा बेल्जियम दौरा लांबणीवर
* दिल्लीतील प्राथमिक शाळा 31 मार्चपर्यंत बंद
नवी दिल्ली : इराणहून नुकत्याच परतलेल्या गाझियाबादमधील एका व्यक्तीला करोना विषाणूची लागण झाली असल्याचे समोर आले. त्यामुळे भारतातील करोनाबाधितांची संख्या 30 वर पोहचली आहे.
दरम्यान, करोनाचा फैलाव रोखण्यासाठी शीघ्र प्रतिसाद पथके स्थापण्याची सूचना केंद्र सरकारने राज्यांना केली आहे.
भारतात नोंद झालेल्या करोनाबाधितांमध्ये राजस्थानात पर्यटनासाठी आलेल्या 16 इटालियन पर्यटकांचाही समावेश आहे. त्याशिवाय, परदेशांत असणाऱ्या 17 भारतीयांना करोनाचा संसर्ग झाला आहे.
त्यामुळे विमानतळांवर सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांची तपासणी करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. करोनाच्या फैलावाचे सावट जगभरातील घडामोडींवर पडले आहे. भारत आणि युरोपीय संघाची पुढील आठवड्यात होणारी शिखर परिषद पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
बेल्जियममध्ये होणाऱ्या त्या परिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार होते. त्यासाठी होणारा मोदींचा दौरा आता लांबणीवर टाकण्यात आला आहे. दिल्ली आणि लगतच्या भागांमध्ये करोनाबाधित आढळले आहेत.
त्यामुळे दक्षतेचा उपाय म्हणून दिल्ली सरकारकडून विविध पाऊले उचलली जात आहेत. त्याचाच भाग म्हणून देशाच्या राजधानीतील सर्व शाळांमधील प्राथमिक वर्ग 31 मार्चपर्यंत बंद ठेवले जाणार आहेत.