satara | मोदी सरकारला पराभूत करणे, हेच इंडियाचे उद्दिष्ट

सातारा, (प्रतिनिधी) – केंद्रातील मोदी सरकार सत्तेतून खाली खेचण्याचे उद्दिष्ट ठेवूनच ‘इंडिया’ आघाडी अस्तित्वात आली आहे. जनतेच्या जिव्हाळ्याचे प्रश्न घेऊन आम आदमी पक्ष महाराष्ट्रात आंदोलने उभी करणार आहे. राज्यात पक्ष सक्षम उमेदवार जाहीर करणार असल्याची माहिती प्रदेश कार्यकारी अध्यक्ष अजित फाटके-पाटील यांनी सातारा येथे पत्रकार परिषदेत दिली
पक्षाचे जिल्हाध्यक्ष धीरज जाधव उपस्थित होते. फाटके-पाटील म्हणाले, देशात लोकशाही धोक्यात आली असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निर्णय एकाधिकारशाहीचे वाटतात. केंद्रातील सत्ताधार्यांना खाली खेचण्यासाठी देशभरातील अनेक प्रादेशिक पक्ष एकत्र आले आहेत. यामध्ये आम आदमी पक्षाचाही समावेश आहे. पक्षाने दिल्ली व पंजाबमध्ये येथे उल्लेखनीय यश मिळवले आहे.
महाराष्ट्रातही याच पद्धतीची बांधणी सुरू आहे. मी पश्चिम महाराष्ट्रात दौरे करत आहे. यामध्ये बूथ स्तरापासून प्रदेश स्तरापर्यंत संघटना बांधणी सुरू आहे. राज्यात सध्या आढावा बैठका सुरू आहेत.
जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर आम्ही केंद्र व राज्य सरकारला धारेवर धरणार आहोत. सातारा जिल्ह्यात सिंचन, टोलमाफी, एफआरपी, पायाभूत सुविधा, हे प्रश्न आणि विकासाच्या मुद्द्यावर पक्ष मोठी आंदोलने उभे करणार आहे. दरम्यान, जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल धीरज जाधव यांचा सत्कार करण्यात आला.





