नवी दिल्ली – अमेरिका जागतिक व्यापाराबाबत नकारात्मक भूमिका घेत असल्यामुळे भारताने पर्यायी देशांना निर्यात वाढविण्याची जोरदार मोहिमाती घेतली आहे. विशेष म्हणजे अमेरिकेसोबतही व्यापार वाढावा या दृष्टिकोनातून भारत आवश्यक ते प्रयत्न करीत आहे. वाणिज्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार भारत सरकार सध्या जगातील किमान 50 देशाबरोबर व्यापार करार करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. यातील बर्याच देशाबरोबर मुक्त व्यापार करार करण्याचा प्रयत्न करीत करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. जगातील काही देश व्यापारचा उपयोग संघर्षासाठी करीत आहेत. अशा परिस्थितीत भारताला विश्वासार्ह व्यापार करणार्या देशाची गरज आहे. अमेरिकेने भारताविरोधात 27 ऑगस्ट रोजी 50 टक्के आयात शुल्क लावाल्यानंतर भारताच्या निर्यातीवर आणि रुपयाच्या मूल्यावर नकारात्मक परिणाम झाला आहे. या पार्श्वभूमीवर वाणिज्य मंत्रालयाने इतर देशाबरोबर व्यापार वाढविण्याचे तयारी सुरू केली असल्याचे दिसून येते. भारत मध्यपूर्व येथील देशाकडून खनिज तेलाचीु आयात करतो. त्यामुळे मध्यपूर्वेतील देशाबरोबर जास्तीत जास्त प्रमाणात मुक्त व्यापार करार करण्याचा प्रयत्न यशस्वी होत आहे. त्यामध्ये सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिरात, कतार कुवेत, ओमान, बहरीन या देशांचा समावेश आहे. संयुक्त अमीराती बरोबर अगोदरच व्यापार सुरू झाला आहे आणि व ओमान सोबतचा व्यापार करार अंतिम टप्प्यात आहे. कतार बरोबर अनेक पातळ्यावर चर्चा सुरू झाली आहे. न्यूझीलंड सोबतचा करार अंतिम टप्प्यात आला आहे. विशेष म्हणजे 27 देशाचा समावेश असलेल्या युरोपियन समुदायाबरोबर एकत्रित व्यापार करार करण्यासाठी गेल्या दोन वर्षापासून प्रयत्न चालू आहेत. त्यातील अनेक देशाबरोबर भारताचा स्वतंत्र व्यापार करार होत आहे किंवा होणार आहे. अमेरिकेसोबतही करारासंदर्भात चर्चेच्या सहा फेर्या झाल्या असून प्राथमिक स्वरूपाचा करार लवकर मार्गी लागण्याची अपेक्षा वाणिज्य मंत्रालयाला आहे.