भारतीय अर्थव्यवस्थेची विक्रमी वाटचाल, 10 वर्षात जीडीपी दुप्पट; लवकरच जपान-जर्मनीला टाकणार मागे

India’s GDP doubles in a decade | गेल्याकाही वर्षात भारताची अर्थव्यवस्था झपाट्याने वाढली आहे. मागील दहा वर्षात जगातील इतर देशांच्या तुलनेत भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर दुप्पट राहिला आहे. अर्थव्यवस्थेचे आकारमान वाढण्याच्या गतीमध्ये भारताने अमेरिका आणि चीनसारख्या मोठ्या अर्थव्यवस्थांना मागे टाकले आहे.
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) या संदर्भातील आकडेवारी जारी केली आहे. 2015 मध्ये भारताची अर्थव्यवस्था 2.1 ट्रिलियन डॉलर्स एवढी होती. तर 10 वर्षांनी 2025 मध्ये देशाची अर्थव्यवस्था 4.3 ट्रिलियन डॉलर्सपर्यंत पोहोचली आहे. भारताची अर्थव्यवस्था या दहा वर्षात तब्बल 105 टक्क्यांनी वाढली.
मागील 10 वर्षातील देशाच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर पाहता भारताने अमेरिका आणि चीनलाही मागे टाकले आहे. भारत सध्या अमेरिका, चीन, जर्मनी आणि जपाननंतर देशातील 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असणारा देश आहे.
गेल्या 10 वर्षात मोठ्या देशांच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीवर नजर टाकली, तर चीनची अर्थव्यवस्था 76 टक्क्यांनी आणि अमेरिकेची अर्थव्यवस्था 66 टक्क्यांनी वाढला आहे. भारताच्या जलद विकासामुळे देशाला प्रमुख जागतिक आणि आर्थिक शक्तींमध्ये महत्त्वाचे स्थान मिळाले आहे. भारत हा जगातील सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था असणारा देश बनला आहे.
2028 पर्यंत भारत जर्मनीलाही मागे टाकणार
जगातील इतर प्रमुख अर्थव्यवस्थांच्या वाढीची आकडेवारी पाहिली तर लक्षात येते की, जर्मनीची अर्थव्यवस्था गेल्या 10 वर्षांत 44 टक्क्यांनी वाढली आहे. तर ब्रिटनची अर्थव्यवस्था 28 टक्के, फ्रान्सची अर्थव्यवस्था 38 टक्क्यांनी वाढली आहे. या देशांच्या तुलनेत भारत अर्थव्यवस्था वाढीमध्ये खूप पुढे आहे. आयएमएफनुसार, सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेच्याबाबतीत भारत या वर्षाखेरीस जपानला, तर 2027 पर्यंत जर्मनीला मागे टाकेल.




