भारताचं परराष्ट्र धोरण सपशेल कोसळलंय – राहुल गांधी

नवी दिल्ली –लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवरील टीकेच्या भडिमाराचे आणि परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर यांच्यावरील प्रश्नांच्या सरबत्तीचे सत्र कायम ठेवले आहे. भारताचे परराष्ट्र धोरण सपशेल कोसळले असल्याचा शाब्दिक हल्लाबोल त्यांनी शुक्रवारी केला.
मोदी सरकारला परराष्ट्र धोरणावरून लक्ष्य करत राहुल यांनी सोशल मीडियावरून जयशंकर यांना ३ प्रश्न विचारले. भारताची समान तुलना पाकिस्तानशी का केली जात आहे? पाकिस्तानचा निषेध करण्यासाठी एकाही देशाने आपल्याला पाठिंबा का दिला नाही? अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना भारत आणि पाकिस्तानमध्ये मध्यस्थी करण्यास कुणी सांगितले, असे सवाल त्यांनी केले.
पहलगाम दहशतवादी हल्ला, ऑपरेशन सिंदूर आणि संघर्षविराम या परस्परांशी निगडीत मुद्द्यांवरून कॉंग्रेस आणि विशेषत: राहुल सातत्याने मोदी सरकार, जयशंकर यांना घेरत आहेत. त्यावरून भाजपनेही जोरदार पलटवार करण्याचे धोरण अवलंबले आहे. त्यातून शाब्दिक युद्धाची तीव्रता वाढल्याने राजकारणही तप्त बनले आहे.
याआधी गुरूवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानमधील भाषणातून पाकिस्तानला पुन्हा निर्वाणीचा इशारा दिला. मात्र, मोदींनी पोकळ भाषणे थांबवावीत, अशा शब्दांत राहुल यांनी त्यांच्यावर निशाणा साधला. दहशतवादाच्या मुद्द्यावर पाकिस्तानच्या म्हणण्यावर विश्वास का ठेवला? ट्रम्प यांच्यापुढे झुकून देशहिताचा बळी का दिला, अशी विचारणाही त्यांनी मोदींना उद्देशून केली. त्याशिवाय, जयशंकर यांचीही कोंडी करण्यासाठी राहुल मागील काही दिवसांपासून विविध प्रश्न विचारत आहेत.





