भारताच्या परकीय चलन साठ्यावर संकट! दोन आठवड्यात ६ अब्ज डॉलरची घट, शेअर बाजारातही घसरण

मुंबई – सरलेल्या आठवड्यात भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांक कमी झाले. देशांतर्गत गुंतवणूकदाराबरोबरच परदेशी गुंतवणूकदारांनी विक्री केली. त्याचबरोबर या आठवड्यामध्ये परदेशी गुंतवणुकीचे प्रकल्प कमी झाले. अशा परिस्थितीत भारताकडे असलेल्या परदेशी गुंतवणुकीचा साठा कमी झाला.
रिझर्व बँकेने जारी केलेल्या माहितीनुसार 11 जुलै रोजी संपलेल्या आठवड्यात भारताकडील परकीय चलन साठा तीन अब्ज डॉलरने कमी होऊन 696.6 अब्ज डॉलर इतका झाला आहे. या अगोदरच्या आठवड्यातही याच कारणामुळे भारताकडील परकीय चलन साठा तीन अब्ज डॉलरने कमी झाला होता.
त्या अगोदर भारताकडील परकीय चलन साठ्यात बरीच वाढ झाली होती. मात्र गेल्या दोन आठवड्यापासून परकीय चलन साठा कमी होत आहे. मात्र असे असले तरी सध्या भारताकडे असलेला परकीय चलन साठा भारताला एक वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी आयात करण्याकरिता पुरेसा आहे. त्यामुळे या आघाडीवर फारशी चिंता करण्याची गरज नसल्याचे मत विश्लेषकांनी व्यक्त केले आहे.
सप्टेंबर 2024 मध्ये भारताकडे असलेला परकीय चलन साठा 704.8 अब्ज डॉलर या विक्रमी पातळीपर्यंत वाढला होता. त्यानंतर मात्र जागतिक परिस्थिती अस्थिर झाल्यामुळे भारतातील परदेशी गुंतवणूक बरीच कमी झाली. मात्र त्यानंतर यात वाढ झाली होती. आता पुन्हा यात घट होत असल्याचे दिसून येत आहे. संबंधित कालावधीमध्ये भारतीय रिझर्व बँकेकडे असलेल्या सोन्याचे मूल्य 998 दशलक्ष डॉलरने कमी होऊन 84.3 अब्ज डॉलर या पातळीपर्यंत गेले. भारताची आंतरराष्ट्रीय नाणेनिधी कडे 4.7 अब्ज डॉलरची ठेव आहे.




