मुंबई – रिझर्व बँकेने जारी केलेल्या आकडेवारीनुसार 28 नोव्हेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात भारताकडील परकीय चलन साठा 1.8 अब्ज डॉलरने कमी होऊन 686.2 इतका झाला आहे. या अगोदरच्या आठवड्यातही भारताकडील परकीय चलन साठा 4.4 अब्ज डॉलरने कमी झाला होता. जगातील इतर मुख्य चलनाच्या स्वरूपात भारत आपल्याकडे परकीय चलन साठा करत असतो. संबंधित आठवड्यामध्ये या चलनाच्या विनिमय दरानुसार देशातील परकीय चलन साठ्याचे मूल्यांकन केले जाते. सध्या सोन्याचे दर वेगाने कमी- जास्त होत आहेत. त्याचा सर्वात जास्त परिणाम परकीय चलन साठ्याच्या मूल्यावर होत असतो. संबंधित आठवड्यामध्ये जागतिक बाजारात सोन्याचे दर वाढल्यामुळे रिझर्व बँकेकडे असलेल्या सोन्याच्या साठ्याचे मूल्य या कालावधीत 1.6 अब्ज डॉलरने वाढून 105.7 अब्ज डॉलर या पातळीवर गेले आहे. रिझर्व बँकेने जागतिक चलन बाजारातील अस्थिरता ध्यानात घेऊन गेल्या काही वर्षापासून सोन्याची खरेदी वाढविली आहे. चलन बाजारातील अस्थिरता पाहता रिझर्व बँकेचा सोने खरेदीचा निर्णय योग्य ठरत असल्याचे दिसून येते. सोने व चांदीच्या दरात भरीव वाढ पुढील आठवड्यात अमेरिकेचे फेडरल रिझर्व व्याज दरात किमान पाव टक्के कपात करण्याची शक्यता असल्यामुळे सोने आणि चांदीच्या दरात जागतिक पातळीवर वाढ होत आहे. अशा परिस्थितीत दिल्ली सराफात सोन्याचा दर 1,300 रुपयांनी वाढून 1,32,900 रुपये प्रति दहा ग्रॅम या पातळीवर गेला. दिल्ली सराफात चांदीचा दरही शुक्रवारी 3,500 रुपयांनी वाढून 1,83,500 रुपये प्रति किलो या पातळीवर गेला. अमेरिकन डॉलर इतर चलनाच्या तुलनेत घसरत असल्यामुळे सोने-चांदीत गुंतवणूक वाढत आहे. अशा परिस्थितीत जागतिक बाजारात सोन्याचा दर 15.10 डॉलरने म्हणजे 0.36 टक्क्यांनी वाढून 4,223 डॉलर व चांदीचा दर 1.82 टक्क्यांनी वाढून 58.17 डॉलर प्रति औंसावर गेला