मुंबई – परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांची शेअर आणि रोखे बाजारातील विक्री आणि इतर कारणामुळे भारताकडील परकीय चलन साठा दोन जानेवारी रोजी संपलेल्या आठवड्यात 9.8 अब्ज डॉलरने कमी होऊन 686.8 अब्ज डॉलर या पातळीवर गेला आहे. या अगोदरच्या आठवड्यात भारताकडील परकीय चलन साठा सोन्याच्या दरवाढीमुळे 3.2 अब्ज डॉलरने वाढला होता. भारत अमेरिकन डॉलर्सशिवाय इतर चलनाच्या माध्यमातून परकीय चलन साठा करीत असतो. संबंधीत आठवड्यात चलनांचे चलन बाजारातील मूल्य कमी- जास्त होत असते. त्या आधारावर भारताकडील परकीय चलन साठ्याचे मूल्यांकन रिझर्व बँकेकडून केले जात असते. संबंधित आठवड्यामध्ये सोन्याचे दर नफेखोरीमुळे कमी झाले. अशा परिस्थितीत भारताकडील सोन्याच्या साठ्याचे मूल्य या आठवड्यामध्ये दोन अब्ज डॉलरने कमी होऊन 111.2 अब्ज डॉलर या पातळीवर आले आहे. परकीय चलन साठ्याचे संवर्धन करण्यासाठी रिझर्व बँक आणि अर्थ मंत्रालय प्रयत्न करत आहे. यासाठी भारत निर्यात वाढविण्याचा प्रयत्न करत आहे. भारताने निर्यात वाढविण्यासाठी अनेक देशांबरोबर मुक्त व्यापार करार केले आहेत. इतर अनेक देशाबरोबर व्यापार करार करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे वाणिज्य मंत्रालयातील अधिकार्यांनी नमूद केले. सरलेल्या आठवड्यामध्ये भारताकडील परकीय चलन साठा कमी झाला असला तरी भारताकडे आता 686 अब्ज डॉलरचा परकीय चलन साठा आहे. हा परकीय चलन साठा भारताला एक वर्षाच्या आयातीसाठी पुरेसा आहे. त्यामुळे या आघाडीवर जास्त चिंता करण्याची गरज नाही असे समजले जाते.