नवी दिल्ली – भारतातील सिमेंट उद्योग आत्मनिर्भर होण्याच्या दिशेने जोरदार आगेकूच करीत आहे. भविष्यातील गरजा ओळखून आर्थिक वर्ष 2026 ते आर्थिक वर्ष 2028 या कालावधीत हा उद्योग 1.2 लाख कोटी रुपयांची भांडवली गुंतवणूक करून उत्पादन क्षमता 170 दशलक्ष टनांनी वाढविण्याची शक्यता असल्याचे एका अभ्यास अहवालात नमूद करण्यात आले आहे. क्रिसील या पतमानांकन संस्थेने सिमेंट उद्योगाची क्षमता आणि उत्पादन या संदर्भातील मूल्यांकन केले आहे. या मूल्यांकनानुसार गेल्या तीन वर्षात या क्षेत्रात जेवढी गुंतवणूक झाली त्यापेक्षा 75 टक्के जास्त गुंतवणूक पुढील तीन वर्षात होण्याची शक्यता आहे. गेल्या तीन वर्षांमध्ये या क्षेत्राची उत्पादन क्षमता 95 दशलक्ष टनांनी वाढली होती. भारत सरकारने पायाभूत सुविधा क्षेत्रांना मोठ्या प्रमाणात चालना दिली आहे. त्याचबरोबर देशातील बांधकाम क्षेत्र वेगाने वाढत आहे. अशा परिस्थितीत देशातील सिमेंट उद्योगाच्या क्षमतेचा पुरेपूर वापर होत आहे. त्याचबरोबर काही प्रमाणात सिमेंटचे निर्यातही केली जात आहे. ही मागणी कायम राहण्याची शक्यता असल्यामुळे सिमेंट उद्योगाला उत्पादन क्षमता वाढवावी लागणार आहे असे या अहवालात नमूद करण्यात आले. एकूण क्षमता 668 दशलक्ष टन – 31 मार्च 2025 च्या मूल्यांकनानुसार देशातील 17 सिमेंट उद्योगाची एकूण उत्पादन क्षमता 668 दशल टन इतकी आहे. पुढील तीन वर्षात यामध्ये आणखी 170 दशलक्ष टनांची भर पडणार आहे. पायाभूत सुविधा आणि बांधकाम क्षेत्र वाढत असल्यामुळे सिमेंटबरोबरच पोलाद आणि इतर बाबींच्या उत्पादन क्षमतेत ही वाढ होण्याची शक्यता आहे.