देशाची सूत्रे अपघाताने मोदींच्या हातात : सोलापूरच्या मेळाव्यात शरद पवारांची टीका

सोलापूर, (प्रतिनिधी) – देशाची सूत्रे अपघाताने नरेंद्र मोदींच्या हातात गेली आणि देशाला त्यांनी पाच वर्षात कुठे नेऊन ठेवले हे न बोललेले बरे, अशा शब्दात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकेची झोड उठविली. सोलापूर लोकसभेचे कॉंग्रेस पक्षाचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रचारार्थ बुधवारी सकाळी कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि मित्र पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात पवार बोलत होते.

जवाहरलाल नेहरू, लालबहाद्दूर शास्त्री, इंदिरा गांधी, राजीव गांधी, नरसिंहराव तसेच मनमोहनसिंगांपर्यंत कॉंग्रेसच्या विचाराने देश चालविण्याची गरज असणाऱ्यांनी देशाची उंची आंतरराष्ट्रीय पातळीवर एका विशिष्ट पातळीवर नेऊन ठेवली आणि देशाचा चेहरा- मोहरा बदलून टाकला. त्याविरुद्ध पाच वर्षांपूर्वी एखादा अपघात झाला आणि त्याचे परिणाम आपण सर्वजण बघत आहोत. त्यामुळे राष्ट्रपातळीवर आणि सोलापूरच्या पातळीवर बदल हवा आहे. जे नाणं खणखणीत वाजणारे आहे, चालणारे आहे, त्या नाण्याचा स्वीकार केला पाहिजे. त्यासाठी महाराष्ट्र आणि देशाच्यादृष्टीने सुशीलकुमार शिंदे यांची उमेदवारी मोलाची आहे. त्यांना विजयी करण्याचे आवाहनही पवार यांनी केले.

एका बाजूला ज्यांनी देश व राज्याचा उत्तम कारभार केला, संपूर्ण देशाने ऐकले असे व्यक्तिमत्व आहे. दुसऱ्या बाजूला प्रशासन,विकास व लोकांचे प्रश्न याची इतंभूत माहिती खात्रीशीर नसलेले असे चित्र बघायला मिळत आहे. त्यामुळे राष्ट्रीय कर्तव्य म्हणून सर्वांनी शिंदे यांच्या विजयासाठी घरोघरी जाऊन मतदारांना बाहेर काढले पाहिजे. यामध्ये चिकाटी न ठेवल्यास त्याची किंमत मोजावी लागेल असा इशारा पवार यांनी यावेळी बोलताना दिला.

शिंदे यांची शेवटची निवडणूक समजूयात 
माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे नेहमी आपली शेवटची निवडणूक आहे. आता तरुणांना संधी मिळाली पाहिजे असे सांगून विरोधकांना गाफील ठेवतात तर कॉंग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना गॅसवर ठेवतात. शरद पवारांनी आपल्या भाषणाची सुरुवात करताना सुशीलकुमार शिंदे यांची हि शेवटची निवडणूक आहे असे शिंदे यांनी सांगितल्याचा उल्लेख केला. मला मात्र नक्की माहित नाही शिंदे यांची शेवटची निवडणूक आहे हे, असे सांगत हरकत नाही असे समजूयात असे सांगताच एकाच हशा पिकाला. त्यामुळे शिंदे यांची शेवटची निवडणूक नेमकी कधी येणार याची चर्चा सुरु होती.

दमाणी यांची संघर्षमय निवडणूक
सोलापूर शहर आणि जिल्ह्याचा पालकमंत्री असताना सोलापूर लोकसभेची सूरजरतन दमाणी यांची संघर्षाची निवडणूक झाली होती. त्याची जबाबदारी आपल्यावर होती. कठीण आणि संघर्षाची निवडणूक जिंकली आणि कॉंग्रेसला मोठे यश मिळाल्याचे सांगत शरद पवार यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.