Pune District : भारतीय युवकांमध्ये जगाचे नेतृत्व करण्याची क्षमता : प्रा. राम शिंदे
Pune District : अशा काळात एमआयटी एडीटी विद्यापीठासारख्या संस्था देशातील संशोधन क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. विद्यापीठे विद्यार्थ्यांमध्ये नवउद्योजकता आणि उद्योजकतेची भावना निर्माण करीत आहेत. त्यामुळे येथून बाहेर पडणारे विद्यार्थी केवळ नोकरी शोधणारे नव्हे, तर नोकरी निर्माण करणारे ठरतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

लोणी काळभोर : एखाद्या घरातील पहिला पदवीधर केवळ स्वतःचे भविष्य घडवत नाही, तर संपूर्ण कुटुंबाच्या प्रगतीचा मार्ग खुला करतो. त्यामुळे शिक्षण हे केवळ करिअर घडविण्याचे साधन नसून सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी माध्यम आहे. आजचा काळ हा संधींचा काळ असून, कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक्स, माहिती विश्लेषण, अंतराळ संशोधन, डिजिटल तंत्रज्ञान आणि रचनात्मक क्षेत्रांत संधींची नवी दालने खुली होत आहेत. जग वेगाने बदलत असून, या बदलाचे नेतृत्व करण्याची क्षमता भारतीय युवकांमध्ये आहे, असे प्रतिपादन विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी केले.
एमआयटी कला, रचना व तंत्रज्ञान विद्यापीठाच्या 11 व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी एमआयटी शिक्षण समूहाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ कराड, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे माजी महासंचालक पद्मश्री प्रा. डॉ. बलराम भार्गव, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष तथा प्रभारी कुलपती प्रा. डॉ. मंगेश कराड, कुलगुरू प्रा. डॉ. राजेश एस., कार्यकारी संचालक प्रा. डॉ. सुनीता कराड, प्र-कुलगुरू डॉ. रामचंद्र पुजेरी, डॉ. मोहित दुबे, डॉ. नचिकेत ठाकूर, कुलसचिव डॉ. महेश चोपडे आदी उपस्थित होते.
प्रा. राम शिंदे म्हणाले, की केवळ ज्ञान पुरेसे नाही. ज्ञानासोबत दैनंदिन जीवनात त्याचा वापर करण्याचे कौशल्य, चारित्र्य आणि सामाजिक बांधिलकी असणे आवश्यक आहे. तंत्रज्ञान कितीही प्रगत झाले तरी माणुसकीची जागा कोणतेही तंत्रज्ञान घेऊ शकत नाही. राष्ट्रीय शिक्षण धोरणामुळे भारतातील शिक्षण अधिक कौशल्याधारित, संशोधनाभिमुख आणि जागतिक दर्जाशी सुसंगत बनविण्याचा प्रयत्न सुरू आहे. अशा काळात एमआयटी एडीटी विद्यापीठासारख्या संस्था देशातील संशोधन क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. विद्यापीठे विद्यार्थ्यांमध्ये नवउद्योजकता आणि उद्योजकतेची भावना निर्माण करीत आहेत. त्यामुळे येथून बाहेर पडणारे विद्यार्थी केवळ नोकरी शोधणारे नव्हे, तर नोकरी निर्माण करणारे ठरतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
प्रा. डॉ. मंगेश कराड म्हणाले, सध्याचे युग तंत्रज्ञानाचे आहे. तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे जग एका क्लिकवर आले आहे. वेगाने बदलणार्या तंत्रज्ञानाच्या काळात विद्यार्थ्यांसह प्राध्यापकांनाही कृत्रिम बुद्धिमत्तेसारख्या नव्या तंत्रज्ञानाशी सुसंगत व्हावे लागेल. विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची वृत्ती रुजविणे आवश्यक आहे.
वर्धापन दिनाच्या कार्यक्रमानिमित्त महाराष्ट्र अकादमी ऑफ नेव्हल एज्युकेशन अँड ट्रेनिंगचे प्राचार्य कॅप्टन प्रेरित मिश्रा यांना विद्यापीठाच्या जडणघडणीत दिलेल्या बहुमूल्य योगदानाबद्दल जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. तसेच डॉ. अश्विनी पेठे, डॉ. अभय हरसुळकर, डॉ. प्रणव पाठक, डॉ. दांडेश्वर बिसोई, राजीव काशिकर, डॉ. सुरेश कापरे आणि डॉ. अशोक तोडमल यांचाही त्यांच्या योगदानाबद्दल विविध पुरस्कारांनी गौरव करण्यात आला. विश्वशांती प्रार्थनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली, तर राष्ट्रगीताने समारोप झाला. प्रास्ताविक डॉ. राजेश एस. यांनी केले. डॉ. पुजेरी यांनी आभार मानले. सूत्रसंचालन प्रा. श्रद्धा वाघटकर, प्रा. स्वप्निल शिरसाठ आणि डॉ. अशोक घुगे यांनी केले.
विद्यार्थ्यांना नवीन तंत्रज्ञानासोबतच मूल्याधिष्ठित शिक्षण मिळावे, या उद्देशाने एमआयटी शिक्षण समूहाची स्थापना झाली. एमआयटीतून शिक्षण घेऊन बाहेर पडणारे विद्यार्थी जगाच्या विविध भागांत संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांचा विश्वशांती व विज्ञानाचा संदेश पोहोचवित आहेत. विज्ञान आणि अध्यात्म या परस्परपूरक बाबी असून, दोन्हींचा समन्वय साधणारे शिक्षण एमआयटी एडीटी संकुलात दिले जात असल्याचा अभिमान आहे.
-प्रा. डॉ. विश्वनाथ कराड, संस्थापक एमआयटी शिक्षण समूह





