Indian tourist stuck Dubai : अमेरिका आणि इस्त्रायल यांनी २८ फेब्रुवारी २०२६ रोजी इराणवर मोठ्या प्रमाणात हल्ले (Indian tourist stuck Dubai) केले, ज्यामध्ये इराणचे सर्वोच्च नेते आयतोल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला. या हल्ल्याला प्रत्युत्तर देत इराणने इस्रायलसह अमेरिकेच्या मित्र राष्ट्रांवर, विशेषतः UAE (दुबई-अबू धाबी), कतार, बहरीन, कुवेत यांसारख्या गल्फ देशांवर क्षेपणास्त्रे, ड्रोन आणि रॉकेट हल्ले सुरू केले आहेत. या युद्धामुळे मध्य पूर्वातील हवाई क्षेत्र पूर्णपणे बंद झाले असून, जगातील सर्वाधिक व्यस्त दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळासह अबू धाबी, दोहा यांसारखे प्रमुख हब बंद पडले आहेत. परिणामी, हजारो भारतीय नागरिक पर्यटक, विद्यार्थी, व्यावसायिक आणि इतर दुबईत अडकले आहेत. महाराष्ट्रातील शेकडो जण या संकटात सापडले असून, त्यांच्या नातेवाईकांकडून केंद्र सरकारकडे तातडीने विशेष उड्डाणे सुरू करण्याची मागणी होत आहे. या संघर्षामुळे दुबईत स्फोट, हल्ले आणि हवाई संरक्षण प्रणालीच्या कार्यामुळे शहरात भीतीचे वातावरण आहे. पाम जुमेराह, बुरज अल अरब, जेबेल अली पोर्ट, एअरपोर्ट परिसर यांसारख्या ठिकाणी हल्ल्यांच्या घटना घडल्या आहेत. एअरलाइन्स जसे Emirates, Etihad, Air India, IndiGo यांनी उड्डाणे रद्द केली असून, हवाई क्षेत्र पुन्हा सुरू होईपर्यंत प्रवाशांना हॉटेलमध्ये किंवा सुरक्षित ठिकाणी थांबावे लागत आहे. भारतीय दूतावास आणि MEA अडकलेल्या नागरिकांशी संपर्कात असून, परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे, पण अद्याप मोठ्या प्रमाणात सुटकेच्या उड्डाणांची घोषणा झालेली नाही. कराडमधील 21 विमा अधिकारी अडकले सातारा जिल्ह्यातील कराड येथील एका विमा कंपनीतील २१ कर्मचारी, ज्यात पी. व्ही. जाधव यांचा समावेश आहे, सहलीसाठी दुबईला गेले होते. ते २५ फेब्रुवारी रोजी परतणार होते, पण युद्धामुळे विमाने रद्द झाल्याने अडकले आहेत. त्यांच्या हॉटेलजवळ स्फोट झाल्याने भीतीचे वातावरण आहे. हॉटेलमधून बाहेर पडण्यास मनाई असल्याने ते खोलीत बंदिस्त झाले आहेत. नातेवाईक सतत संपर्क साधत असून, सुरक्षेची चिंता वाढली आहे. पिंपरी-चिंचवडमधील 40 ज्येष्ठ पर्यटक अडकले पिंपरी-चिंचवड शहरातील माजी नगरसेविका सुमन नेटके यांच्या नेतृत्वाखालील ४० ज्येष्ठ नागरिकांचा ग्रुप पर्यटनासाठी दुबईला गेला होता. या ग्रुपमध्ये सांगवीतील गायकवाड कुटुंबातील ६ सदस्यांचा समावेश आहे. ते सुरक्षित हॉटेलमध्ये आहेत, पण वाढत्या हल्ल्यांमुळे आणि विमान उड्डाणे रद्द झाल्याने भारतात परतता येत नाही. नातेवाईक चिंतेत असून, केंद्र सरकारकडे विशेष उड्डाणे सुरू करण्याची मागणी करत आहेत.