#INDvSA 2ND T20I : भारतीय फलंदाजीचा सूर्य तळपला, दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी…

गुवाहाटी – सलामीवीर लोकेश राहुल, रोहित शर्मा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव व दीनेश कार्तिक या पाचही प्रमुख फलंदाजांनी केलेल्या वादळी फलंदाजीच्या जोरावर भारताने तिन टी-20 सामन्यांच्या मालिकेतील रविवारी झालेल्या दुसऱ्या सामन्यात 20 षटकांत 3 गडी गमावून 237 धावांचा डोंगर उभारला.
दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बवुमाने नाणेफेक जिंकत भारताला प्रथम फलंदाजी देण्याचा निर्णय घेतला. मात्र, भारतीय फलंदाजांनी त्याचा हा निर्णय चुकीचा ठरवत वादळी फलंदाजी केली. कर्णधार रोहितच्या साथीत राहुलने संघाला 10 व्या षटकांत 96 धावांची सलामी दिली. रोहित चांगला खेळत असताना 43 धावांवर बाद झाला. त्याने 37 चेंडूंचा सामना करताना 7 चौकार व 1 षटकार फटकावला. त्यानंतर राहुलने आपले अर्धशतक पूर्ण केले. 57 धावांच्या या खेळीत त्याने 28 चेंडूत 5 चौकार व 4 षटकार फटकावले. धावांचा वेग वाढवण्याच्या प्रयत्नात तो बाद झाला. त्यावेळी कोहलीला साथ देण्यासाठी प्रचंड भरात असलेला सूर्यकुमार यादव खेळपट्टीवर आला व त्याने दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजीचा पालापाचोळा केला. त्याने अवघ्या 19 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. या जोडीने तिसऱ्या गड्यासाठी शतकी भागीदारी केली.
नागराज मैदानावर अवतरले
या सामन्याला प्रारंभ होण्यापूर्वी चक्क एक साप मैदानात अवतरला व सगळ्यांचीच पाचावर धारण बसली. त्याला मैदानातील सफारीवरून बाहेर काढण्यासाठी काही मिनिटे वाया गेली. अर्थात त्यामुळे मुळ सामन्याच्या खेळावर काहीही परिणाम झाला नाही.
सूर्यकुमार 61 धावांवर चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात धावबाद झाला. त्याने या खेळीत अवघ्या 22 चेंडूंचा सामना करताना 5 चौकार व 5 षटकारांची आतषबाजी केली. तो बाद झाल्यावर दीनेश कार्तिकने कोहलीला साथ दिली. अखेरच्या दोन षटकांत कोहलीने आक्रमक खेळी केली. मात्र, वीसाव्या षटकांत त्याला फलंदाजीची संधीच मिळाली नाही व त्याचे अर्धशतक पूर्ण होऊ शकले नाही. तो 28 चेंडूत 7 चौकार व 1 षटकारासह 49 धावांवर नाबाद राहिला. तर या षटकात अफलातून फटकेबाजी करणारा दीनेश कार्तिक 7 चेंडूत 1 चौकार व 2 षटकारांच्या मदतीने 17 धावांवर नाबाद राहिला.
या सामन्यात भारतीय संघाने आपल्या फलंदाजीचा खरा दर्जा सिद्ध करताना द्विशतकी धावांची मजल मारली. कर्णधार रोहितने राहुलच्या साथीत संघाला धडाकेबाज प्रारंभ करुन दिला. राहुलचे या मालिकेतील हे यश आता आगामी टी-20 विश्वकरंडक स्पर्धेत संघासाठी लाभदायक ठरणार आहे. मात्र, रोहित पुन्हा एखदा चांगला खेळत असताना तसेच अर्धशतकाच्या उंबरठ्यावर असताना बाद झाला. यंदाच्या मोसमात आतापर्यंत झालेल्या विविध सामन्यांत रोहितने धावांची पस्तीशी किंवा चाळीशी पार केल्यावर अनावश्यक फटका मारण्याच्या प्रयत्नात आपली विकेट सातत्याने बहाल केली. हेच चित्र या सामन्यातही दिसले.
दुसरीकडे हे दोघे बाद झाल्यावर पुुन्हा एकदा कोहली व सूर्यकुमारने संघाचा डाव सावरताना जबाबदारीने धोका पत्करुन आक्रमक फलंदाजी केली. कोहली भरात आला असला तरीही सूर्यकुमारची वादळी फलंदाजी जास्त कौतुकास्पद ठरली. त्याने कोहलीवरचा भार कमी करताना प्रत्येक सामन्यात आपल्या आक्रमक फलंदाजीचा तसेच गुणवत्तेचा दाखला दिला आहे. त्याचा हा फॉर्म या महिन्यात ऑस्ट्रेलियात सुरु होत असलेल्या टी-20 विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघाच्या संभाव्य विजेतेपदाची दावेदारी सिद्ध करणाराच ठरत आहे.
संक्षिप्त धावफलक –
भारत – 20 षटकांत 3 बाद 237 धावा. (रोहित शर्मा 43, लोकेश राहुल 57, सूर्यकुमार यादव 61, विराट कोहली नाबाद 49, दीनेश कार्तिक नाबाद 17, केशव महाराज 2-23).





