सिडनी – ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निघालेला भारतीय संघ गुरुवारी युएईतून सिडनीत दाखल झाला. त्यानंतर करोना चाचणीचे अहवाल आल्यानंतर भारतीय संघाने शनिवारपासून सरावास सुरुवात केली आहे. या सरावाचे काही फोटो बीसीसीआयने ट्विटरवर शेअर केले आहेत.
भारतीय संघ जवळपास अडीच महिन्यांच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात 3 एकदिवसीय सामने, 3 टी-20 आणि 3 कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. या दौऱ्याला 27 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. पण त्याआधी भारतीय संघातील सर्व सदस्यांना 14 दिवस क्वारंटाईनमध्ये राहावे लागणार आहे. पण असे असले तरी त्यांना क्वारंटाईनदरम्यान सराव करण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार आता भारतीय संघातील खेळाडूंनी सरावाला सुरुवात केली आहे.
बीसीआयने शेअर केलेल्या फोटोंमध्ये दिसते की खेळाडूंनी मैदानावर सराव करण्याबरोबरच जिममध्येही घाम गाळला आहे. या फोटोमध्ये हार्दिक पंड्या, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, उमेश यादव, मोहम्मद सिराज, हनुमा विहारी हे खेळाडू मैदानात धावताना तर दीपक चहर, चेतेश्वर पुजारा, टी नटराजन, श्रेयस अय्यर असे अनेक खेळाडू जिममध्ये व्यायाम करताना दिसत आहेत.
ऍडलेड सामनाच्या तिकिटांना मागणी
भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात होणारा बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यांच्या तिकिटांची मागणी वाढली आहे. मालिकेतील हा पहिला कसोटी सामना दिवस-रात्र असा ऍडलेड येथे खेळण्यात येणार आहे.
हा मालिकेतील एकमेव सामना आहे, ज्यात विराट कोहली खेळणार आहे. पहिला सामना खेळल्यानंतर विराट कोहली मायदेशी परतणार आहे. ऑस्ट्रेलियात डे-नाईट सामन्यांसाठी प्रेक्षकांमध्ये खूप उत्सुकता असते.
त्यातच विराटची खेळी पाहण्यासाठी प्रेक्षक आतूर आहेत. त्यामुळे 17 ते 21 डिसेंबर या कालावधीत ऍडलेड ओव्हल मैदानावर रंगणाऱ्या कसोटी सामन्याच्या तिकिटांची मागणी प्रचंड वाढली आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर या सामन्यासाठी मैदानाच्या क्षमतेपेक्षा निम्मे म्हणजे 27 हजार प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश देण्यास मंजुरी देण्यात आली आहे.