नवी दिल्ली : भारताची युवा पूमसे तायक्वोंडोपटू रूपा बायोरने ऐतिहासिक कामगिरी करत जागतिक क्रमवारीत ८ व्या स्थानी झेप घेतली आहे. जागतिक क्रमवारित अव्वल १० मध्ये पोहचणारी ती पहिलीच भारतीय पूमसे तायक्वोंडोपटू ठरली आहे. या नव्या जागतिक क्रमवारीत ती मागील वैयक्तिक सर्वोत्तम १९ व्या स्थानावरून थेट ८ व्या क्रमांकावर झेपावली आहे. ऑस्ट्रियातील इन्सब्रुक येथे २९-३० नोव्हेंबर रोजी झालेल्या वर्ल्ड तायक्वोंडो प्रेसिडेंट कप युरोप स्पर्धेत रूपाने कांस्यपदक पटकावले होते. याआधी ऑगस्ट महिन्यात ऑस्ट्रेलिया ओपन तायक्वोंडो स्पर्धेतही तिने कांस्यपदकाची कमाई केली होती. याच कामगिरीच्या जोरावर तिच्या क्रमवारीत सुधारणा झाली आहे. पूमसे हा तायक्वोंडोचा अ-लढती स्वरूपाचा प्रकार आहे. यात खेळाडू ठरलेल्या क्रमाने (पॅटर्न) विविध तंत्रे सादर करतात आणि जिम्नॅस्टिक्ससारखे मूल्यांकन पंच करतात. सध्या हा प्रकार ऑलिंपिकमध्ये नाही, परंतु आशियाई क्रीडा स्पर्धेत त्याचा समावेश आहे.मुंबईतील इंडो-कोरियन तायक्वोंडो अकादमीत सराव करणाऱ्या रूपाला यंदा एप्रिलमध्ये क्रीडा मंत्रालयाच्या टार्गेट आशियाई क्रीडा स्पर्धा गट मध्ये स्थान मिळाले आहे. सध्याच्या जागतिक क्रमवारीत अव्वल शंभरात पोहोचणारी ती भारताची एकमेव तायक्वोंडो खेळाडू आहे.