अमेरिकेत पेट्रोल पंपावर पार्ट-टाईम जाॅब करणाऱ्या भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या

हैदराबाद : तेलंगाणाची राजधानी हैदराबादच्या एलबी नगर भागातील विद्यार्थी पोले चंद्रशेखर याची अमेरिकेच्या डलास शहरात लुटारूंनी गोळ्या घालून हत्या केली. बीडीएस पदवी पूर्ण केल्यानंतर उच्च शिक्षणासाठी २०२३ मध्ये अमेरिका गेलेल्या चंद्रशेखर हा गेल्या सहा महिन्यांपासून नोकरीच्या शोधात असताना पेट्रोल पंपावर पार्ट-टाइम काम करत होता. या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
३ ऑक्टोबरच्या सकाळी डलासमधील गॅस स्टेशनवर ही भयानक घटना घडली. स्थानिक वृत्तांनुसार, अज्ञात लुटारूंनी लूटपाटीसाठी स्टेशनवर गोळीबार सुरू केला. छातीवर दोन गोळ्या लागल्याने चंद्रशेखर रक्ताच्या थारोळ्यात पडले. त्यांना तात्काळ हॉस्पिटलमध्ये नेले, पण रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. डलास पोलिसांनी एका संशयिताला अटक केली असून, तपास सुरू आहे.
हैदराबादमधील एलबी नगर भागात वाढलेले चंद्रशेखर हा आई-वडिलांचे एकमेव आधार होता. हैदराबादमधून बीडीएस पदवी घेतल्यानंतर मास्टर्ससाठी अमेरिका गेला. नोकरी न मिळाल्याने पार्ट-टाइम काम करत असताना ही भयावह घटना घडली. घटनेची वार्ता कुटुंबापर्यंत पोहोचताच आई-वडील आणि शेजारी हतबल झाले.
बीआरएस आमदार सुधीर रेड्डी आणि माजी मंत्री टी. हरीश राव हे शनिवारी चंद्रशेखरांच्या घरी पोहोचले. एक्सवर पोस्ट करून त्यांनी दुःख व्यक्त करत राज्य सरकारकडे मृतदेह ताबडतोब भारतात आणण्याची मागणी केली. चंद्रशेखरांच्या मेहनतीची प्रशंसा करतानाच, अशा घटनांविरुद्ध कठोर कारवाईची अपेक्षा व्यक्त केली.





