अमेरिकेच्या व्याजदर कपातीच्या शक्यतेने भारतीय शेअर बाजारात तेजी; सेन्सेक्स 81,635 वर बंद

मुंबई – गेल्या आठवड्यात अमेरिकेच्या फेडरल रिझर्वचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांनी सप्टेंबर महिन्यात व्याजदर कपातीची शक्यता सूचित केली आहे. त्यानंतर अमेरिकेतील डाऊ जोन्स, नॅशडॅक या निर्देशांकासह जागतिक शेअर बाजार निर्देशांक उंचावले. परिणामी भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांक सोमवारी अर्धा टक्क्यापर्यंत वाढले होते.
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 329 अंकांनी म्हणजे 0.40 टक्क्यांनी वाढून 81,635 अंकावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 97 अंकांनी वाढून 24,967 अंकावर बंद झाला. अमेरिकेची परिस्थिती सुधारण्याची शक्यता असल्यामुळे अमेरिकेला निर्यात करणार्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्राच्या कंपन्यांच्या शेअरच्या भावात भरघोस वाढ झाली.
माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील इन्फोसिस, टीसीएस, एचसीएल टेक, महिंद्रा या कंपन्यांबरोबरच टाटा मोटर्स, सन फार्मा, मारुती, टायटन या कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ झाली. भारत इलेक्ट्रॉनिक्स, एशियन पेंट्स, एअरटेल, आयसीआयसीआय बँक या कंपन्या पिछाडीवर राहिल्या.
जिओजीत वित्तीय सेवा या कंपनीचे विश्लेषक विनोद नायर यांनी सांगितले की, पॉवेल यांच्या वक्तव्यानंतर अमेरिकेच्या कर्जरोख्यावरील परतावा कमी झाला. माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचा निर्देशांक इतर निर्देशांकापेक्षा वाढला. जीएसटी सुधारणा आणि सुयोग्य पर्जन्यमानामुळेही शेअर बाजारात सकारात्मक वातावरण आहे.
मात्र परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी शुक्रवारी 1,622 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली. रशिया- युक्रेन संघर्ष समाप्त होण्याची शक्यता वाढली आहे. अशा परिस्थितीत भारतासह जगातील गुंतवणूकदारांचे लक्ष या घटनाक्रमाकडे असणार आहे.




