जम्मू: पाकिस्तानी बाजूकडून प्रत्यक्ष ताबा रेषेवर जम्मू काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात करण्यात आलेल्या गोळीबारात भारतीय लष्कराचा एक जवान शहीद झाला. त्यामुळे पाकिस्तानी माऱ्यात या महिन्यात शहीद झालेल्या एकूण भारतीय जवानांची संख्या आता चार झाली आहे.
पाकने आज पुंछ सेक्टरमधील कृष्णा घाटी भागातही गोळीबार केला. या दोन्ही ठिकाणच्या गोळीबाराला भारतीय जवानांनीही चोख उत्तर दिले. आज राजौरी सेक्टरमध्ये झालेल्या गोळीबारात शहीद झालेल्या जवानाचे नाव दीपक करकी असे आहे. पहाटे साडे पाच वाजण्याच्या सुमाराला पाक बाजूकडून हा गोळीबार सुरू झाला.
त्याला भारतीय जवानांनी जे प्रत्युत्तर दिले त्यात पाकिस्तानी बाजुची किती जीवित हानी झाली हे मात्र समजू शकलेले नाही. पाकिस्तानकडून सीमा भागात मोठ्या प्रमाणात प्रक्षोभक गोळीबार वारंवार केला जात असून यंदाच्या वर्षात 10 जूनपर्यंत अशा एकूण 2027 घटना घडल्या आहेत.