Share Market | गेल्याकाही दिवसांपासून भारतीय शेअर बाजारात सातत्याने घसरण पाहायला मिळत आहे. या आठवड्याची बाजारातील सुरुवात देखील झाली आहे. आज सकाळी सेन्सेक्सची सुरुवात 297.8 अंकांच्या घसरणी 75,641.41 अंकांसह झाली. त्याच वेळी निफ्टी 119.35 अंक घसरून 22,809.90 अंकांसह उघडला. बाजार उघडताच अवघ्या काही मिनिटात मोठी घसरण पाहायला मिळाली. सेन्सेक्स जवळपास 500 अंकांनी खाली आल्याचे दिसून आले. आज सकाळी 9:20 ला बेंचमार्क BSE सेन्सेक्स 518.92 अंक किंवा 0.68% घसरून 75,420.29 अंकांवर पोहोचला. तर NSE निफ्टी 115.55 अंक कमी किंवा 0.5% घसरून 22,813.70 अंकांवर पोहोचला. ऑटो, आयटी आणि रियल्टी क्षेत्राला सर्वाधिक फटका बसला आहे. सेन्सेक्सच्या 30 स्टॉकमध्ये सर्वाधिक घसरण महिंद्रा & महिंद्रामध्ये पाहायला मिळाली. कंपनीचे शेअर्स 4.25% घसरून 2,815.75 रुपयांवर ट्रेड करत होते. त्यानंतर टाटा स्टील 1.79% घसरून ₹132.00 वर ट्रेड करत होते. सेन्सेक्सच्या 30 स्टॉकपैकी केवळ 4 मध्ये तेजी दिसून आली आहे. महिंद्रा, टाटा स्टील, एनटीपीसी, झोमॅटो, टीसीएस, इन्फोसिस इत्यादी कंपन्यांमध्ये मोठी घसरण झाली आहे. तर सन फार्मा, एचयूएल, सिप्ला या या कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळाली. निफ्टी मिडकॅप आणि स्मॉलकॅपमध्येही मोठी घसरण दिसून आली. कंपन्यांचे खराब तिमाही निकाल, मिडकॅप-स्मॉल कॅप शेअर्सची विक्री, परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार (FIIs) कडून सतत होणारी विक्री ही स्टॉक मार्केटमध्ये घसरणीचे सर्वात प्रमुख कारणे आहेत.