मुंबई : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर क्रीडा जगतातील अनेक स्पर्धा आणि क्रिकेटचे सामने रद्द करण्यात आले होते. तर काही स्पर्धाच्या तारखांमध्ये बदल करण्यात आला. याचा फटका जगभरात प्रसिध्द असलेल्या इंडियन प्रिमिअर लीग स्पर्धेलासुध्दा बसला होता आणि ही स्पर्धा पुढे ढकलण्यात आली होती. त्यातच भारतातील वाढते कोरोनाचे संकट पाहता आयपीएल होणार की नाही, अशी शंका उपस्थित करण्यात येत होती. मात्र आता यंदाच्या वर्षीच ही स्पर्धा होणार असल्याचं निश्चित झालं असून आयपीएल चेअरमन ब्रिजेश पटेल यांनीच याबाबतची अधिकृत माहिती दिली आहे.
आयपीएलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी याबाबतची माहिती दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, 19 सप्टेंबर ते 8 नोव्हेंबर या कालावधीत आयपीएल युएईमध्ये खेळवण्याबाबत आमची चर्चा झाली. या स्पर्धेत सामील होणाऱ्या संघांनाही आम्ही याची माहिती दिली आहे.’
Indian Premier League (IPL) 2020 to be played from 19th September to 8th November. It will be a full-fledged tournament: Brijesh Patel, IPL Chairman pic.twitter.com/QsULr9EqtZ
— ANI (@ANI) July 24, 2020
पटेल यांच्या माहितीनुसार, ही स्पर्धा 51 दिवस चालणार असून यादरम्यान 60 सामने होणार आहेत. सामन्यासाठी अबू दाबी, दुबई, शारजाह ही तीन मुख्य ठिकाणं असणार आहे. आता बीसीसीआय सरकारच्या परवानगीची वाट पाहात आहे. त्यानंतर स्पर्धेचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे, असं ब्रिजेश पटेल यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, सोमवारी आयसीसीने टी-20 विश्वकरंडक स्पर्धा लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतल्यावर आयपीएलचा मार्ग मोकळा झाला होता. करोनाचा धोका अद्याप कायम असल्याने ही स्पर्धा बीसीसीआयने निश्चित केलेल्या कालावधीत भारतात होण्याची शक्यता धूसर असल्याने युएईचाच पर्याय निश्चित मानला जात होता.