Captain Smit Machhar : 174 जीव वाचवणाऱ्या भारतीय कॅप्टन स्मित मच्छार यांच्या धाडसाला अमेरिकन संसदेत सलाम
Captain Smit Machhar : फ्लाईदुबई फ्लाइट 1073 वाचवणारे भारतीय पायलट कॅप्टन स्मित मच्छार यांच्या धाडसाचे अमेरिकन प्रतिनिधी सभेने कौतुक केले.

Captain Smit Machhar : फ्लाईदुबईच्या फ्लाइट 1073 ला कथित दहशतवादी हल्ल्यापासून वाचवणारे भारतीय पायलट कॅप्टन स्मित मच्छार यांच्या धाडसाचे अमेरिकेच्या प्रतिनिधी सभेने कौतुक केले आहे. त्यांच्या सन्मानासाठी आणि विमानावरील हल्ल्याचा निषेध करण्यासाठी 5 ऑक्टोबर 2026 रोजी खास प्रस्ताव मांडण्यात आला. हा प्रस्ताव खासदार जोश गॉटहाइमर यांनी मायकेल मॅककॉल आणि डॉन बेकन यांच्यासोबत मांडला असून तो परराष्ट्र व्यवहार समितीकडे पाठवण्यात आला आहे.
30 सप्टेंबरला फ्लाईदुबईचे विमान दुबईहून इस्रायलमधील तेल अवीवकडे जात होते. विमानात सुमारे 174 प्रवासी होते. त्यात 27 मुलांसह चार अमेरिकन नागरिकांचाही समावेश होता. प्रस्तावानुसार, उड्डाणादरम्यान विमानाच्या फर्स्ट ऑफिसरने कॅप्टन मच्छार यांच्यावर आपत्कालीन कुऱ्हाडीने हल्ला करून विमानाचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे विमान अवघ्या 30 सेकंदांत 14 हजार फुटांपेक्षा अधिक खाली आले.
गंभीर जखमी असूनही कॅप्टन मच्छार यांनी कॉकपिटचा दरवाजा उघडला. त्यामुळे ऑफ-ड्यूटी पायलटला आत प्रवेश करून विमानाचे नियंत्रण घेता आले. क्रू आणि प्रवाशांनीही हल्लेखोराला नियंत्रणात आणण्यास मदत केली. त्यानंतर विमान सौदी अरेबियातील तबुक विमानतळावर सुरक्षित उतरवण्यात आले. सर्व प्रवासी आणि क्रू सुरक्षित राहिले.
संयुक्त अरब अमिरातीच्या अटॉर्नी जनरलने 3 ऑक्टोबरला ही घटना दहशतवादी कृत्याचा प्रयत्न असल्याचे सांगितल्याचा उल्लेख प्रस्तावात आहे. अमेरिकन प्रतिनिधी सभेने कॅप्टन मच्छार तसेच इतर जखमींच्या लवकर बरे होण्याची कामना केली आहे.





