Indian Open Snooker Tournament : आरव, विजय, अमरदीप अंतिम 16 खेळाडूत….

पुणे – डेक्कन जिमखाना क्लब तर्फे आयोजित ‘मोतीलाल ओसवाल करंडक’ डेक्कन जिमखाना अखिल भारतीय खुल्या स्नुकर स्पर्धेत १३ वर्षीय आरव संचेती, मुंबईचा विजय नचानी, पुण्याचा अमरदीप घोडके, जेसन मल्होत्रा आणि अभिजीत रानडे या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून आगेकूच केली. ज्युनिअर गटाच्या सामन्यात आरव संचेती, आयान खान यांनीही सलग विजय मिळवत आगेकूच केली.
डेक्कन जिमखाना क्लबच्या स्नुकर हॉलमध्ये सुरू असलेल्या स्पर्धेच्या बाद फेरीमध्ये पुण्याचा १३ वर्षीय आणि महाराष्ट्र सब-ज्युनिअर (१८ वर्षाखालील) स्नुकर विजेतेपद मिळवणारा आरव संचेती याने हृषीकेश इंगळे याच्यावर १८-७१, ३४-०२, ६४-१३, १६-४१, ५९-२८ असा संघर्षपूर्ण विजय मिळवला. पहिल्या फ्रेममध्ये हृषीकेश याने आरव याच्यावर वर्चस्व गाजवले आणि ७१-१८ अशी फ्रेम जिंकली.
दुसर्या फ्रेममध्ये आरवने प्रतिकार केला आणि ३४-०२ अशा विजयासह १-१ अशी बरोबरी साधली. तिसर्या फ्रेममध्येही आरवने ६४-१३ असा विजय मिळवून २-१ अशी आघाडी घेतली. चौथ्या फ्रेममध्ये ४१-१६ अशा गुणफरकाने हृषीकेश याने फ्रेम जिंकून २-२ अशी बरोबरी केली. निर्णायक आणि अंतिम फ्रेममध्ये आरवने ५९-२८ अशा फरकाने फ्रेम जिंकून सामन्यात विजय मिळवला.
दुसर्या मानांकित विजय नचानी याने मुदस्सर खान याचा ८६-१७, ३५-३०, ६०-३३ असा सहज पराभव केला. आपल्या या विजयात विजय याने ८६ गुणांचा ब्रेकही नोंदविला. अमरदीप घोडके याने रोहीत रावत याचा ६५-०१, ३९-२०, ७४-२० असा सरळ फ्रेममध्ये सहज पराभव केला. पुण्याच्या अभिजीत रानडे याने मनोज गाडगीळ याचा ८७-४२, ३९-२३, ५७-०८ असा सहज विजय मिळवून आगेकूच केली. जेसन मल्होत्रा याने वैभव मालखेडे याचा ६५-४२, ४१-२०, ५७-२७ असा सहज पराभव करून अंतिम १६ खेळाडूंमध्ये स्थान पक्के केले. ज्युनिअर गटाच्या सामन्यांमध्ये आरव संचेती याने सलग तीन तर, आयान खान याने सलग दोन विजय मिळवून आगेकूच केली.





