अमेरिकेत भारतीय पुरूषाची पत्नी व मुलासमोर निर्घृण हत्या; शिर धडावेगळे करून कचरापेटीत टाकले

डलास (अमेरिका) – डलास येथील डाउनटाउन सूट्स मोटेलमध्ये बुधवारी घडलेल्या एका थरारक घटनेने सर्वांचे मन सुन्न केले आहे. भारतीय नागरिक चंद्रा नागमल्लैया (५०) यांची त्यांच्या पत्नी व मुलासमोर चाकूने वार करून हत्या करण्यात आली. या घटनेचे कारण एक किरकोळ वॉशिंग मशीनचा वाद ठरला.
पोलिसांच्या माहितीनुसार, नागमल्लैया व आरोपी योर्डानिस कोबोस-मार्टिनेज हे दोघेही मोटेलमध्ये कर्मचारी म्हणून काम करत होते. मोटेलमधील खराब वॉशिंग मशीन वापरू नये, असे नागमल्लैया यांनी सांगितले होते. यावरून वाद निर्माण झाला. संतापलेल्या आरोपीने हातातील धारदार शस्त्राने त्यांच्यावर वार केले. नागमल्लैया जीव वाचवण्यासाठी धावत असताना आरोपीने त्यांचा पाठलाग करून वारंवार हल्ला केला.
दरम्यान, नागमल्लैया यांची पत्नी व मुलगा आवाज ऐकून घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मदत करण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने त्यांना दूर ढकलून हल्ला सुरूच ठेवला. परिसरात पत्नीच्या आर्त किंकाळ्या घुमत होत्या; मात्र कोणीही धाडसाने पुढे आले नाही.
या रक्तरंजित हल्ल्यात आरोपीने नागमल्लैया यांचे शिर धडापासून वेगळे केले. त्यानंतर ते शिर फुटबॉलसारखे लाथ मारून काही अंतरावर फेकले व नंतर ते उचलून जवळच्या कचरापेटीत टाकले. ही थरकाप उडवणारी घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
पोलिसांनी आरोपी कोबोस-मार्टिनेज याला घटनास्थळावरूनच ताब्यात घेतले. चौकशीत तो क्यूबाचा रहिवासी असल्याचे स्पष्ट झाले. यापूर्वीही त्याला अटक करण्यात आली होती; मात्र क्यूबा त्याचा स्वीकार करण्यास तयार नसल्यामुळे त्याला सोडण्यात आले होते. सध्या त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भारतीय दूतावासाची प्रतिक्रिया –
ह्यूस्टनस्थित भारतीय महावाणिज्य दूतावासाने या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. दूतावासाने सामाजिक माध्यमांवर म्हटले आहे की, “भारतीय नागरिक चंद्रा नागमल्लैया यांच्या दुर्दैवी मृत्यूबद्दल आम्हाला अतिशय दुःख झाले आहे. त्यांच्या कुटुंबीयांशी आम्ही संपर्कात आहोत व आवश्यक ती सर्व मदत पुरवली जात आहे. आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे. आम्ही या प्रकरणावर लक्ष ठेवून आहोत.” या निर्घृण हत्येमुळे अमेरिकेत राहणाऱ्या भारतीय समाजात मोठी खळबळ उडाली असून सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.





