‘ChatGPT, DeepSeek चा वापर बंद करा’, केंद्र सरकारचा कर्मचाऱ्यांना आदेश; ‘हे’ आहे कारण

Ai Apps: अनेक कामांमध्ये एआयचा वापर प्रचंड वाढला आहे. चॅटजीपीटी, ओपनएआय सारख्या AI अॅप्स आणि एआय प्लॅटफॉर्म्सचा वापर सर्रासपणे केला जात आहे. मात्र, आता भारत सरकारने आदेश जारी करत एआय अॅप्सचा वापर टाळण्यास सांगितले आहे. या आदेशामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना एआय अॅप्स आणि प्लॅटफॉर्म्सबाबत आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत.
सरकारी कार्यालयात एआयच्या वापराबाबत वित्त मंत्रालयाने आदेश जारी केला आहे. या आदेशात म्हटले आहे की, काही कर्मचारी ऑफिसच्या कॉम्प्युटर आणि लॅपटॉपवर एआय अॅप्सचा (जसे की ChatGPT, DeepSeek इत्यादी) वापर करतात. मात्र, हे सरकारच्या गोपनीय दस्तऐवज आणि डेटासाठी धोकादायक ठरू शकते.
केंद्र सरकारने आदेशात म्हटले आहे की, कर्मचाऱ्यांनी सरकारी कॉम्प्युटर, लॅपटॉप आणि डिव्हाइसेसवर एआय अॅप्स आणि टूल्सचा वापर करू नये. सरकारने हा निर्णय डेटा सुरक्षा आणि गोपनीयतेला प्राधान्य देऊन घेतला आहे.
एआय प्लॅटफॉर्मद्वारे हाताळण्यात येणाऱ्या डेटाबाबत जगभरात चिंता वाढली आहे. ChatGPT सह अनेक AI मॉडेल्स युजर इनपुट्स एक्सटर्नल सर्व्हरवर प्रोसेस करतात. त्यामुळे डेटा लीक होण्याचा धोका निर्माण होतो. यामुळे अनेक देशातील सरकार व मोठ्या कंपन्यांनी एआयच्या वापरावर मर्यादा घातल्या आहेत.
सरकारी कार्यालयांमध्ये पारंपारिक सॉफ्टवेअरचा वापर केला जातो. त्या तुलनेत एआय टूल्स क्लाउड-आधारित असतात. त्यामुळे या कंपन्यांच्या डेटा साठवणुकीवर सरकारचे कोणत्याही प्रकारचे थेट नियंत्रण नसते. त्यामुळे खबरदारी म्हणून अशा टूल्सचा वापर करणे टाळावे, अशा सूचना दिल्या जात आहेत.





