Nimisha Priya : निमिषा प्रियाला भारत सरकार शक्य ती सर्व मदत पुरवणार – परराष्ट्र मंत्रालय

नवी दिल्ली : येमेनमध्ये फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेली भारतीय परिचारिका निमिषा प्रिया हिला भारत सरकारकडून शक्य असेल ती सर्व मदत देण्यात येईल, असे परराष्ट्र मंत्रालयाच्यावतीने सांगण्यात आले आहे. निमिषा प्रिया ही मूळची केरळच्या पलक्कड जिल्ह्यातल्या कोल्लेंगोडे येथील परिचारिका असून येमेनमध्ये एका व्यक्तीची हत्या केल्याचा तिच्यावर आरोप आहे.
या आरोपाखाली तिला येमेनमध्ये पाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या संदर्भात निमिषा प्रिया हिला सर्व मदत पुरवली जाणार असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैयस्वाल यांनी म्हटले आहे. निमिषा प्रिया हिला येमेनमध्ये सुनावण्यात आलेल्या पाशीच्या शिक्षेची माहीती सरकारला मिळाली असून निमिषा प्रियाचे पालक तिच्या सुटकेसाठी वेगवेगळ्या पर्याय चाचपडून पहात आहेत. या संदर्भात शक्य असेल ती सर्व मदत भारत सरकारकडून निमि, प्रियाच्या कुटुंबीयांना केली जाणार आहे, असेही जैयस्वाल यांनी सांगितले.
निमिषा प्रियावरील हत्येच्या आरोपावर येमेनमधील न्यायालयातील खटल्याची सुनावणी पहिल्यांदा २०२० मध्ये सुरू झाली होती. येमेनमधील सर्वोच्च न्यायाधिकरणाने निमिषा प्रियाच्या फाशीच्या शिक्षेवर नोव्हेंबर २०२३ मध्ये शिक्कामोर्तब केले आहे. येमेनचे अध्यक्ष रशिद अल-आलिमी यांनी तिच्या फाशीच्या शिक्षेला अंतिम मंजूरी देखील दिली आहे.


