Indian Films Trending on Pakistani Netflix : ओटीटी प्लॅटफॉर्मवर सतत नवे चित्रपट आणि वेब सीरिज येत असतात. भारतीय चित्रपटांना भारताबाहेरही मोठी पसंती मिळत असून पाकिस्तानमध्येही ते आवडीने पाहिले जात आहेत. सध्या पाकिस्तानी नेटफ्लिक्सवर एक भारतीय चित्रपट नंबर 1 वर ट्रेंड करत आहे. २१ डिसेंबर रोजी पाकिस्तानमध्ये नेटफ्लिक्सवर पहिल्या क्रमांकावर असलेला भारतीय चित्रपट म्हणजे तेलुगू भाषेतील ‘द गर्लफ्रेंड’. हा चित्रपट ७ नोव्हेंबर २०२५ रोजी भारतात प्रदर्शित झाला होता आणि नंतर हिंदीतही रिलीज करण्यात आला. बॉक्स ऑफिसवरही या चित्रपटाने चांगली कमाई केली आहे. ‘द गर्लफ्रेंड’ या चित्रपटात रश्मिका मंदाना, अनु इमॅन्युएल आणि दीक्षित शेट्टी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. www.netflix.com/tudum च्या माहितीनुसार हा चित्रपट सध्या पाकिस्तानमध्ये सर्वाधिक पाहिला जात आहे आणि प्रेक्षकांकडून त्याला भरभरून प्रतिसाद मिळतो आहे. कमाईबाबत बोलायचे झाले तर, sacnilk.com नुसार या चित्रपटाने भारतात पहिल्या आठवड्यात ११.३ कोटी रुपये कमावले होते. दुसऱ्या आठवड्यात ६.०३ कोटींची कमाई झाली. अशा प्रकारे भारतात एकूण सुमारे १७.५ कोटी रुपयांचा व्यवसाय या चित्रपटाने केला. तर जागतिक पातळीवर या चित्रपटाची कमाई सुमारे २७.७५ कोटी रुपये इतकी आहे. विशेष म्हणजे फक्त ‘द गर्लफ्रेंड’च नाही, तर ‘जॉली एलएलबी 3’, ‘सनी संस्कारी की तुलसी कुमारी’, ‘बँड बाजा बारात’ आणि ‘लेडीज वर्सेस रिकी बहल’ हेही भारतीय चित्रपट पाकिस्तानी नेटफ्लिक्सच्या टॉप 10 यादीत ट्रेंड करत आहेत. यावरून हे स्पष्ट होते की पाकिस्तानमध्येही भारतीय चित्रपटांना मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांचे प्रेम मिळत आहे.