भारतीय डॉक्टरची अमेरिकेत हत्या

न्यूयॉर्क – अमेरिकेत अलबामाच्या टस्कालूसा येथे एका भारतीय डॉक्टरची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. डॉ. रमेशबाबू पेरामसेटी असे त्यांचे नाव असून ते आंध्र प्रदेशातील तिरूपती जिल्ह्यातील रहिवासी आहेत. गोळी लागल्यावर त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. शुक्रवारी ही घटना घडली.
डॉ. रमेशबाबू यांनी अमेरिकेत आपली स्वतंत्र ओळख प्रस्थापित केली होती. त्यांनी स्थानिक डॉक्टरांच्या मदतीने क्रिमसन नेटवर्कची स्थापना केली होती आणि अनेक रूग्णालयांचे संचालन केले होते. आरोग्य क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान होते. क्रिमसन केअर नेटवर्कच्या टीमने त्यांच्या मृत्यूच्या बातमीला दुजोरा दिला आहे. दरम्यान, दु:खाच्या या प्रसंगात आमच्या खासगीपणाचा आदर केला जावा असे आवाहन पेरामसेटी यांच्या कुटुंबाने केले आहे.
पेरामसेटी यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आणि दोन मुली असा परिवार आहे. हे सगळेच अमेरिकेत वास्तव्याला आहेत. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या बातमीनुसार आरोग्य सेवा क्षेत्रात केलेल्या मोलाच्या कामगिरीसाठी टस्कलूसा येथील एका रस्त्याला पेरामसेटी यांचे नाव देण्यात आले आहे. कोविडच्या काळात त्यांनी अत्यंत प्रभावीपणे स्थानिकांना मदत केली होती. त्यासाठी त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले होते.





