नवी दिल्ली: माहिती तंत्रज्ञानाच्या युगात बदलत्या गरजा लक्षात घेऊन भारतीय लष्कराने आपल्या सोशल मीडिया धोरणात मोठे बदल केले आहेत. नव्या नियमांनुसार, आता लष्करी अधिकारी आणि जवानांना ‘इन्स्टाग्राम’वर आपले खाते उघडता येणार आहे. मात्र, राष्ट्रीय सुरक्षा आणि गोपनीयतेचा विचार करून या वापरावर कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. फक्त ‘प्रेक्षक’ म्हणून परवानगी – भारतीय लष्कराने जारी केलेल्या नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार, जवान इन्स्टाग्रामचा वापर केवळ माहिती मिळवण्यासाठी किंवा पोस्ट पाहण्यासाठी करू शकतील. त्यांना कोणत्याही पोस्टवर कमेंट (Comment) करणे, पोस्ट लाईक (Like) करणे किंवा स्वतःचा कोणताही कंटेंट पोस्ट (Post) करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. इतकेच नव्हे तर दुसऱ्याची पोस्ट ‘रिपोस्ट’ करण्यावरही बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान, यूट्यूब, एक्स (ट्विटर), क्वोरा आणि इन्स्टाग्राम यांसारख्या प्लॅटफॉर्मचा वापर केवळ ‘व्ह्यूअर’ (प्रेक्षक) म्हणून करता येईल. युजर जनरेटेड कंटेंटवर बंदी असेल, जवानांना स्वतःचे फोटो, व्हिडिओ किंवा मते या प्लॅटफॉर्मवर मांडता येणार नाहीत, व्हॉट्सॲप, टेलिग्राम आणि सिग्नल यांसारख्या मेसेजिंग ॲप्सवरून केवळ ‘अवर्गीकृत’ (Unclassified) माहितीची देवाणघेवाण करता येईल. मात्र, ही चर्चा केवळ परिचित व्यक्तींशीच असावी, अशी अट आहे. लिंक्डईन या प्रोफेशनल प्लॅटफॉर्मचा वापर केवळ रिझ्युमे अपलोड करण्यासाठी करता येईल. बदलाचे कारण काय? नोव्हेंबरमध्ये झालेल्या ‘चाणक्य डिफेन्स डायलॉग’मध्ये लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी स्मार्टफोनबाबत महत्त्वाची दखल घेतली होती. जवानांना आपल्या कुटुंबाशी संपर्कात राहण्यासाठी आणि ई-बुक्सच्या माध्यमातून ज्ञान मिळवण्यासाठी स्मार्टफोन आवश्यक आहे. मात्र, डिजिटल युगात वावरताना संवेदनशील माहिती शत्रूच्या किंवा अज्ञात व्यक्तींच्या हाती लागू नये, हा या नव्या धोरणामागचा मुख्य उद्देश आहे. “सैन्य दलाला डिजिटल युगापासून पूर्णपणे दूर ठेवणे शक्य नाही. जवानांनी देश-विदेशातील घडामोडींबाबत अपडेट राहावे, हा यामागचा हेतू आहे. मात्र, सुरक्षिततेच्या नियमांचे उल्लंघन होणार नाही, याची जबाबदारी सर्वस्वी संबंधित जवानाची असेल,” असे लष्करी सूत्रांनी स्पष्ट केले आहे. यापूर्वी जवानांना इन्स्टाग्रामवर खाते उघडण्यास परवानगी नव्हती, केवळ ‘एक्स’चा वापर ते करू शकत होते. नव्या नियमांमुळे जवानांना सोशल मीडियाशी जोडले जाण्याची संधी मिळाली असली तरी, ‘शिस्त आणि सुरक्षा’ या दोन महत्त्वाच्या अटींचे पालन करणे अनिवार्य असणार आहे.