पुणे | भारतीय सैन्य करणार दगडूशेठ गणपतीची प्रतिष्ठापना

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – भारतीय लष्करातील ३३, १९, १, २४ आणि ६ मराठा बटालियनच्या सैनिकांनी जम्मू-काश्मीर, राजस्थान आणि लेह लडाखसह भारताच्या विविध सीमावर्ती भागात दगडूशेठच्या श्रींची प्रतीकात्मक मूर्ती स्थापन करण्याची इच्छा व्यक्त केली.
यावर ट्रस्टने सैनिकांच्या इच्छेला मान देऊन श्रींची हुबेहुब २ फुटी प्रतिकात्मक मूर्ती देण्याचे मान्य केले. त्यानुसार नुकत्याच या मूर्ती जम्मू-काश्मीर, राजस्थान आणि लेह लडाखसह विविध ठिकाणी रवाना झाल्या आहेत.
सन २०११ पासून मराठा बटालियन आणि दगडूशेठ गणपती ट्रस्टचे जवळचे संबंध आहेत. सीमेवरील भारतीय लष्करी ठाण्यामध्ये गणेशाची मूर्ती स्थापन केल्याने मराठा बटालियनच्या सैनिकांना वेगळी ऊर्जा मिळते.
तसेच या ठिकाणी देशामधील सर्व राज्यांतील सैनिक कार्यरत असतात. त्यामुळे बाप्पाचा आशीर्वाद सर्व सैनिकांना मिळेल, अशी भावना देखील मराठा बटालियनच्या सैनिकांनी व्यक्त केली आहे. स्थापित केली जाणारी मूर्ती ही श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या मूर्तीप्रमाणेच असावी, अशी त्यांची मनोमन भावना होती.
त्याप्रमाणे ट्रस्टकडे विनंती करणारे पत्र पाठवले होते. सलग १४ वर्षे हा उपक्रम सुरु असून, बटालियनच्या संख्येत देखील वाढ होत आहे.
मराठा बटालियन दरवर्षी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरी करते. त्यामुळे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या प्रतिकात्मक गणेश मूर्तीची स्थापना अनेक वर्षांपासून देशाच्या विविध सीमावर्ती भागात केली जाते.
यंदा ट्रस्टतर्फे पाच मूर्ती लष्करातील मराठा बटालियनला देण्यात आल्या आहेत. – माणिक चव्हाण, अध्यक्ष, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट





