Indian Army: गंगाखेड (ज्ञानेश्वर फड) – “हवा से नहीं फौजियों की सांसो से लहराता है तिरंगा…” या उक्तीप्रमाणे भारतीय सीमांचे रक्षण करण्यासाठी आपल्या आयुष्यातील उमेदीची १७ वर्षे समर्पित करणारे खादगावचे दोन वीरपुत्र लान्स नायक सुरेश महादेव फड आणि लान्स नायक दिलीप विक्रम दहिफळे हे सेवानिवृत्त होऊन आपल्या मायगावी परतले आहेत. शनिवारी (दि. २ मे) या दोन्ही जवानांच्या सन्मानार्थ खादगाव ग्रामस्थांच्या वतीने अत्यंत उत्साहात ‘सेवानिवृत्त सत्कार समारंभ व सैनिक गौरव सोहळा’ आयोजित करण्यात आला होता. रेल्वे स्टेशन ते गावापर्यंत भव्य रॅली – सेवानिवृत्तीनंतर गावी परतलेल्या या दोन्ही सुपुत्रांचे स्वागत करण्यासाठी संपूर्ण गाव एकवटले होते. सकाळी गंगाखेड रेल्वे स्टेशन येथून खादगावापर्यंत भव्य रॅली काढण्यात आली. यावेळी देशभक्तीपर गीतांच्या तालावर आणि ‘भारत माता की जय’च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. ठिकठिकाणी ग्रामस्थांनी या जवानांवर पुष्पवृष्टी करून त्यांचे औक्षण केले. सत्कार आणि गौरव सोहळा – श्री हनुमान मंदिर परिसरात मुख्य सत्कार समारंभ पार पडला. जवान सुरेश महादेव फड (२४ मराठा लाईट इन्फन्ट्री) आणि जवान दिलीप विक्रम दहिफळे (२२ मराठा लाईट इन्फन्ट्री) यांनी भारतीय लष्कराच्या विविध कठीण क्षेत्रात बजावलेल्या कामगिरीचा यावेळी गौरव करण्यात आला. यावेळी ‘ह.भ.प. देशभक्त प्रेमी वैजनाथ महाराज थोरात’ यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले होते, ज्यातून राष्ट्रभक्तीचा जागर करण्यात आला. गावाचा अभिमान – खादगावच्या या दोन्ही सुपुत्रांनी १७ वर्षे भारत मातेची यशस्वी सेवा करून गावाची मान उंचावली आहे. या सोहळ्यासाठी समस्त गावकऱ्यांसह भारतीय आजी-माजी सैनिक संघटना आणि सर्व मित्र मंडळांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमानंतर उपस्थित सर्वांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. आज खादगावमध्ये केवळ सत्कारच झाला नाही, तर येणाऱ्या पिढीसमोर देशसेवेचा एक आदर्श या दोन्ही सैनिकांनी उभा केला आहे.