Indian Army : अटल बोगद्यात भारतीय सेनेचा थरार; ‘कोर ऑफ सिग्नल्स डेअर डेव्हिल्स’चा विश्वविक्रमाचा प्रयत्न
Indian Army : कारगिल विजय दिनानिमित्त 'व्हील्स ऑफ व्हॅलर : संचार शक्ती' मोहिमेत १० जवानांनी दोन मोटारसायकलींवरून अटल बोगदा ९ मिनिटे ४७.९७ सेकंदांत पार केला

Indian Army : भारतीय सेनेच्या कोर ऑफ सिग्नल्सतर्फे राबविण्यात येत असलेल्या ‘व्हील्स ऑफ व्हॅलर : संचार शक्ती’ या राष्ट्रव्यापी मोटारसायकल मोहिमेअंतर्गत अटल बोगद्यात (अटल टनेल, रोहतांग) धाडसी विश्वविक्रमाचा प्रयत्न यशस्वीपणे पार पडला. कारगिल विजय दिनाच्या निमित्ताने आयोजित या उपक्रमात कोर ऑफ सिग्नल्सच्या डेअर डेव्हिल्स पथकाने दोन मोटारसायकलींवर तब्बल १० जवानांना स्वार करून ९.८ किलोमीटर लांबीचा अटल बोगदा अवघ्या ९ मिनिटे ४७.९७ सेकंदांत पार करत इतिहास रचला.
समुद्रसपाटीपासून सुमारे १०,०७५ फूट उंचीवर असलेल्या जगातील सर्वात लांब उंचावरील महामार्ग बोगद्यात हा पराक्रम करण्यात आला. या कामगिरीत जवानांनी असामान्य संतुलन, अचूक समन्वय, धैर्य, टीमवर्क आणि उच्च दर्जाचे व्यावसायिक कौशल्य दाखवून दिले.
हा विश्वविक्रमाचा प्रयत्न कारगिल विजय दिनानिमित्त कोर ऑफ सिग्नल्सच्या डेअर डेव्हिल्स पथकाने नियोजित केलेल्या विविध साहसी उपक्रमांतील पहिला महत्त्वाचा टप्पा आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून कठोर प्रशिक्षण, सातत्यपूर्ण सराव आणि तांत्रिक तयारीनंतर ही कामगिरी साकारण्यात आली.
या संपूर्ण उपक्रमादरम्यान सर्व सुरक्षा नियम आणि कार्यपद्धतींचे काटेकोर पालन करण्यात आले. स्थानिक प्रशासन, पोलिस आणि संबंधित यंत्रणांच्या समन्वयातून कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले. त्यामुळे सहभागी जवान, आयोजक आणि नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यात आली.
सिग्नल ऑफिसर-इन-चीफ तथा कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विवेक डोग्रा (सेना मेडल) यांनी या यशस्वी आयोजनासाठी मनाली जिल्हा प्रशासन, हिमाचल प्रदेश पोलिस, सीमा रस्ते संघटनेचे महासंचालक (DGBR), प्रोजेक्ट योजक, प्रोजेक्ट दीपक आणि ३८ बॉर्डर रोड्स टास्क फोर्स (३८ BRTF) यांचे विशेष आभार मानले. सर्व यंत्रणांच्या प्रभावी समन्वयामुळे हा विश्वविक्रमाचा प्रयत्न यशस्वी झाल्याचे त्यांनी सांगितले.
‘व्हील्स ऑफ व्हॅलर : संचार शक्ती’ ही मोहीम केवळ विश्वविक्रमासाठी नसून, देशभरातील युवक, माजी सैनिक आणि नागरिकांमध्ये राष्ट्रप्रेम, शिस्त आणि राष्ट्रनिर्मितीचा संदेश पोहोचविण्याचा तिचा उद्देश आहे. युद्धस्मारके, लष्करी आस्थापने, संचार केंद्रे आणि शैक्षणिक संस्थांमधून भारतीय सेनेची गौरवशाली परंपरा जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम या मोहिमेद्वारे केले जात आहे.
अटल बोगद्यातील हा विक्रमाचा प्रयत्न केवळ मोटारसायकलवरील कौशल्याचे प्रदर्शन नसून, भारतीय सेनेची साहसी वृत्ती, शिस्त, नावीन्य, उत्कृष्ट सांघिक समन्वय आणि कार्यक्षमता यांचे प्रभावी दर्शन घडविणारा ठरला. “Swift, Secure and Connected” या कोर ऑफ सिग्नल्सच्या ब्रीदवाक्याला साजेशी ही कामगिरी असल्याचे भारतीय सेनेने म्हटले आहे.







