भारतीय लष्कर आणि गणवेश

– गायत्री वाजपेयी

सैन्य दलाच्या गणवेशात बदल करण्याची मागणी लष्कराकडून संरक्षण मंत्रालयाकडे नुकतीच करण्यात आली आहे. सैन्याचा गणवेश हा लष्करी अधिकाऱ्यांसोबतच सर्वसामान्य नागरिकांसाठीदेखील अभिमानाची बाब आहे. या गणवेशाबाबत नागरिकांमध्ये जितका आदर आहे, तितकेच कुतूहलदेखील असते. मात्र आपल्याला नेहमी पाहयाला तो एकच गणवेश लष्करी अधिकारी धारण करत नाहीत. तर विविध ऋतु, समारंभ आणि तुकडीनुसार लष्करी अधिकाऱ्यांचे गणवेश ठरविलेले असतात. या प्रत्येक गणवेशाचे रंग वेगळे असून प्रत्येकाची स्वत:ची वेगळी खासियत असते. अशाच काही लष्कारी गणवेशाचा आढावा खास “प्रभात’च्या वाचकांसाठी.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

नियमित काम : औपचारिक पद्धतीतील या गणवेशात हिवाळा आनि उन्हाळा या ऋतुनुसार दोन प्रकार आहेत. हिवाळ्यात पीच रंगाचा शर्ट, काळा टाय आणि फिकट हिरवा ब्लेझर आणि टोपी असे या गणवेशाचे स्वरूप असते. तर उन्हाळ्यात फिकट हिरवा .शर्ट आणि पॅन्ट असे स्वरूप असते.

ब्लू पॅट्रोल : लष्करी समारंभासाठी या गणवेशाचा वापर केला जातो. तसेच “मेस ड्रेस’ म्हणूनही हा गणवेश वापरला जातो. विशेषत: हिवाळ्यातील समारंभासाठी या प्रकारचा गणवेश वापरला जातो. गडद निळा अथवा हिरव्या रंगाच्या या गणवेशात बंदगळ्याचा कोट वापरला जातो. यावर अधिकाऱ्याची “रॅंक’ स्पष्टपणे दिसेल अशा पद्धतीने खांद्यावर लावले जातात.

समारंभावेळचा गणवेश : विविध पुरस्कार, परेड अथवा मानवंदना देण्याप्रसंगी हा गणवेश धारण केला जातो. औपचारिक शर्ट त्यावर कोट आणि पॅम्ट असे या गणवेशाचे स्वरूप असून, गळ्याभोवती स्कार्फ, कमरबंद, मेडल्स धारण केले जातात. हिवाळ्यात फुल स्लीव्स तर उन्हाळ्यात हाफ स्लीव्ह्स स्वरूपाचे गणवेश घातले जातात. हा गणवेशात आणि ब्ल्यु पॅट्रोल प्रकारच्या गणवेशात बरेच साधर्म्य असते.

कॉम्बॅट अथवा जंगल ड्रेस : सर्वसामान्य नागरिकांमध्ये लष्करी अधिकाऱ्याची प्रतिमा निर्माण करणारा गणवेश म्हणजेच हा कॉम्बॅट अथवा जंगल ड्रेस गणवेश आहे. गडद आणि फिकट रंगाच्या चौकटीचा शर्ट आणि त्याच प्रकारची पॅन्ट असे या गणवेशाचे स्वरूप आहे. हिवाळ्यात अथवा सुरक्षेसाठी यावर जॅकेट घातले जाते. बहुतांश वेळा लष्करी सराव, मोहिमा अथवा युद्धात हा गणवेश वापरला जातो. शांतता क्षेत्रात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांसहित सर्वच लष्करी अधिकाऱ्यांना दर शुक्रवारी हा गणवेश धारण करणे बंधनकारक असते. याव्यतिरिक्त इतरही अनेक प्रकारचे गणवेश लष्करात आढळून येतात. विशेषत: तुकडी, रॅंक यानुसारही या गणवेशात वेगळेपण आढळून येते.

काय असतील संभाव्य बदल?
गणवेश बदलाबाबत मंत्रालयाकडे सातत्याने मागणी होत आहे. गणवेश बदलांमधील शक्‍यतांबाबत विचार सुरू असून, त्यासाठी इतर राष्ट्रांच्या सैन्य गणवेशाबाबत अभ्यास केला जात आहे. यामध्ये जगातील अनेक राष्ट्रांच्या सैन्यांप्रमाणे भारतीय सैन्याच्या गणवेशातही “रॅंक’ दर्शविण्यासाठी बटनाचा वापर करणे, शर्ट आणि पॅंटच्या रंगात बदल करणे, बेल्ट घालण्याच्या पद्धतीतील बदल तसेच लष्करी अधिकारी अधिक आरामदायी आणि चांगले दिसतील याचा विचार करून त्यानुसार गणवेशात बदल करण्याबाबत प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले जात आहे.

यापूर्वी झालेले बदल :
लष्करी गणवेशात यापूर्वीदेखील बदल करण्यात आला होता. आतापर्यंत तीन वेळा हे बदल करण्यात आले होते. त्यापैकी पहिला बदल हा स्वातंत्र्यानंतर भारतीय सेना आणि पाकिस्तानी सेना यांच्यामधील फरक जाणवण्यासाठी करण्यात आला होता. त्यानंतर 1980 साली गणवेशात बदल करून त्याला “डिसरप्टिव्ह पॅटर्न बेटल ड्रेस’ असे नाव देण्यात आले. परंतु हा गणवेश उष्ण आणि दमट वातावरणात वापरण्यासाठी योग्य नसल्याने तो बदलण्यात आला. त्यानंतर सैन्याचा गणवेश हा सीमा सुरक्षा दल आणि केंद्रीय राखीव पोलीस दल यांपासून भिन्न दिसावा यासाठी 2005 साली पुन्हा एकदा गणवेशात बदल करण्यात आला होता.

“सैन्याचे सध्याचे गणवेश हे अतिशय चांगले असून, ते आरामदायीदेखील आहेत. त्यामुळे गणवेशात बदल करण्याची मला गरज वाटत नाही. गणवेशात बदल करणे ही खूप विस्तृत प्रक्रिया आहे. तसेच त्यासाठी बराच वेळ, मेहनत आणि पैसा लागतो. भारतीय सेनेचा विचार करता, प्रत्येक जवान आणि अधिकारी यांच्यासाठी गणवेश बनविण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसे खर्च करावे लागतील. जे सध्याच्या परिस्थितीत आवश्‍यक वाटत नाही. त्यापेक्षा तेच पैसे सैन्य दलाला अधिक सक्षम करण्यासाठी वापरल्यास सैन्याला त्याचा अधिक फायदा होईल.’
– लेफ्टनंट जनरल डी.बी. शेकटकर (नि.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)