Indian Air Force Chief : भारतीय हवाई दलाला नवे प्रमुख; एअर चीफ मार्शल आशुतोष दीक्षित यांनी स्वीकारली सूत्रे
Indian Air Force Chief : एअर चीफ मार्शल आशुतोष दीक्षित यांनी भारतीय हवाई दलाच्या 29 व्या प्रमुखपदाची सूत्रे स्वीकारली. लढाऊ विमानांची कमतरता, तेजस एमके-1एचे वितरण आणि 114 राफेल विमानांची खरेदी ही त्यांच्यासमोरील प्रमुख आव्हाने आहेत.

Indian Air Force Chief : भारतीय हवाई दलाच्या प्रमुखपदी एअर चीफ मार्शल आशुतोष दीक्षित यांनी 31 ऑक्टोबर 2026 रोजी पदभार स्वीकारला. हवाई दलाचे ते 29 वे प्रमुख आहेत. त्यांनी निवृत्त झालेले एअर चीफ मार्शल अमर प्रीत सिंह यांच्याकडून सूत्रे स्वीकारली. यापूर्वी दीक्षित हवाई दलाचे उपप्रमुख म्हणून कार्यरत होते. पदभार स्वीकारण्यापूर्वी त्यांना औपचारिक मानवंदना देण्यात आली.
हवाई दलाची लढाऊ क्षमता वाढवणे, स्वदेशी विमानांची निर्मिती वेगाने पूर्ण करणे आणि भविष्यातील सुरक्षेच्या आव्हानांना सामोरे जाणे ही त्यांच्यासमोरील प्रमुख कामे असतील. विशेषतः लढाऊ विमानांच्या कमतरतेमुळे त्यांच्या कार्यकाळाला महत्त्व प्राप्त झाले आहे.
लढाऊ विमानांची संख्या वाढवण्याचे आव्हान –
भारतीय हवाई दलाकडे सध्या 42 लढाऊ विमानांची पथके (फायटर स्क्वॉड्रन) असणे अपेक्षित आहे. मात्र, प्रत्यक्षात सुमारे 29 पथके कार्यरत आहेत. जुन्या मिग-21 विमानांना सेवेतून हटवण्यात येत आहे. त्यांच्या जागी नवीन विमाने दाखल होण्यास विलंब होत असल्याने ही कमतरता वाढली आहे.
हवाई दलाचे माजी प्रमुख एअर चीफ मार्शल ए.पी. सिंह यांनी लढाऊ क्षमता टिकवण्यासाठी दरवर्षी 36 ते 40 नवीन लढाऊ विमाने हवाई दलात दाखल होणे आवश्यक असल्याचे म्हटले होते. त्यामुळे नवीन प्रमुखांसमोर विमानांची संख्या वाढवण्याचे मोठे आव्हान असेल. भारताला दोन आघाड्यांवर सुरक्षेच्या आव्हानांना सामोरे जावे लागत असल्याने हवाई दलाची तयारी मजबूत ठेवणेही महत्त्वाचे आहे.
तेजस विमानांच्या निर्मितीला गती देण्याची गरज –
स्वदेशी बनावटीच्या तेजस एमके-1ए विमानांच्या वितरणाला होत असलेला विलंब हा आणखी एक महत्त्वाचा प्रश्न आहे. फेब्रुवारी 2021 मध्ये हवाई दलाने 48 हजार कोटी रुपयांचा करार करून 83 तेजस विमानांची ऑर्डर दिली होती. या विमानांचे वितरण 2024 पासून सुरू होणे अपेक्षित होते.
मात्र, जीई एफ404 इंजिनचा पुरवठा, सॉफ्टवेअर तपासणी आणि तांत्रिक अडचणींमुळे वितरण रखडले आहे. याशिवाय आणखी 97 विमाने खरेदी करण्याची योजना आहे. त्यामुळे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडला (एचएएल) उत्पादनाचा वेग वाढवण्यास सांगणे आणि वेळेत विमाने उपलब्ध करून घेणे हे दीक्षित यांच्यासमोरील महत्त्वाचे काम असेल.
114 राफेल विमानांच्या खरेदीकडे लक्ष –
हवाई दलासाठी 114 राफेल लढाऊ विमाने खरेदी करण्याची प्रस्तावित योजना देखील महत्त्वाची आहे. फेब्रुवारी 2026 मध्ये संरक्षण अधिग्रहण परिषदेने या खरेदीला प्राथमिक मंजुरी दिली होती. मात्र, अद्याप अंतिम करार झालेला नाही.
विमानांची किंमत, करारातील अटी आणि भारतात उत्पादन करण्याची योजना यावर पुढील प्रक्रिया अवलंबून असेल. त्यामुळे हा प्रस्ताव प्रत्यक्ष खरेदीपर्यंत नेणे हे नव्या हवाई दलप्रमुखांसाठी महत्त्वाचे ठरणार आहे.
3,500 तासांपेक्षा अधिक उड्डाणाचा अनुभव –
एअर चीफ मार्शल आशुतोष दीक्षित यांना 6 डिसेंबर 1986 रोजी हवाई दलाच्या लढाऊ विमान विभागात कमिशन मिळाले. ते अनुभवी चाचणी वैमानिक आणि प्रशिक्षक आहेत. त्यांनी मिराज-2000, मिगच्या विविध आवृत्त्या, जग्वार, हॉक आणि तेजस यांसारखी लढाऊ विमाने उडवली आहेत. त्यांच्या नावावर 3,500 तासांपेक्षा अधिक उड्डाणाचा अनुभव आहे.
त्यांच्या अनुभवाचा उपयोग करून हवाई दलाचे आधुनिकीकरण, नवीन विमानांचा समावेश आणि लढाऊ सज्जता वाढवण्याची जबाबदारी आता त्यांच्यावर असेल.




