T-20 Cricket : भारताचा श्रीलंकेवर सात गडी राखून विजय; मालिकेत 2-0 ने आघाडी

धर्मशाला : श्रेयस अय्यरची दमदार अर्धशतक आणि रवींद्र जडेजा आणि संजू सॅमसन यांची तुफान फटकेबाजीच्या जोरावर भारतीय क्रिकेट संघाने श्रीलंकेवर 7 गडी राखून दणदणीत विजय मिळवला. या विजयासह भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली.
भारताकडून रोहित शर्मा आणि इशान किशन झटपट बाद झाल्यानंतर श्रेयसने दमदार फलंदाजी करत नाबाद 74 धावा केल्या. तर जडेजाने नाबाद 45 आणि संजू सॅमसनने 39 धावा केल्या.
श्रीलंकेचा सलामीवीर पाथुम निसांकाचे दमदार अर्धशतक आणि आणि कप्तान दासुन शनाकाच्या वादळी 47 धावांच्या खेळीमुळे श्रीलंका संघाने निर्धारित 20 षटकांत पाच बाद 183 धावांपर्यंत मजल मारली. भारतासमोर विजयासाठी 184 धावांचे आव्हान दिले आहे.
धर्मशाला येथे खेळण्यात आलेल्या सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीवीर पाथुम निसांका आणि दानुषका गुणातिलका यांनी श्रीलंकेला आक्रमक सुरुवात करून दिली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 9 षटकांतच 67 धावांची मोठी भागिदारी केली. फिरकीपटू रवींद्र जडेजाने भारताला पहिले यश मिळवून दिले.
त्याने गुणातिलकाला व्यंकटेश अय्यरकरवी झेलबाद केले. गुणातिलकाने 4 चौकार आणि 2 षटकारांसह 38 धावा केल्या. यानंतर मधल्या फळीत चरिथ असलांका (2), कामिल मिशारा (1) आणि दिनेश चंडीमल (9) हे झटपट बाद झाल्याने लंकेची 4 बाद 102 अशी अवस्था झाली.
दुसरीकडे निसांकाने एका बाजुने निर्णायक खेळी करत कर्णधार दासुन शनाकासोबत अर्धशतकी भागीदारी रचली. दरम्यान निसांकाने अर्धशतक पूर्ण केले. 19व्या षटकात भुवनेश्वर कुमारने त्याला पायचीत पकडले. निसांकाने 53 चेंडूत 11 चौकारांसह 75 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. कर्णधार दासुन शनाका याने अखेरच्या षटकात धावांचा पाऊस पाडला. शनाकाने 19 चेंडूत 2 चौकार आणि 5 षटकारांसह नाबाद 47 धावांची खेळी करत संघाला 20 षटकांत 5 बाद 183 अशी सन्मानजनक धावसंख्या मिळवून दिली. अखेरच्या पाच षटकांत श्रीलंकेच्या फलंदाजांनी 80 धावा चोपल्या आहेत.
भारतीय संघाकडून जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, रविंद्र जाडेजा आणि यजुवेंद्र चहल यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली. हर्षल पटेल सर्वाधिक महागडा गोलंदाज ठरला आहे. हर्षल पटेलच्या चार षटकात श्रीलंकेच्या फंलदाजांनी तब्बल 52 धावा वसूल केल्या.





