नवी दिल्ली – देशात नव्याने स्थापन झालेल्या “इंडिया’ आघाडीला 320 पेक्षा अधिक जागा मिळतील, असा विश्वास आसामातील ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंटने व्यक्त केला आहे. या पक्षाचे सरचिटणीस अमिनुल इस्लाम यांनी एएनआयला सांगितले की, विरोधकांची ही इंडिया आघाडी केंद्रातील सत्ताधारी भाजपची हकालपट्टी करेल. ते म्हणाले, की भाजपचा जनाधार दिवसेंदिवस कमी होत असून त्यांना पुन्हा सत्ता मिळण्याची शक्यता उरलेली नाही. याची प्रचिती त्यांना कर्नाटकात आली आहे. तेथे त्यांचा दारूण पराभव झाला असून त्या राज्यात भाजपला आता लोकसभेच्या एक अंकीच जागा मिळतील, असा दावाही त्यांनी केला. भाजपने आपले कोणतेही निवडणूक आश्वासन पूर्ण केलेले नाही. उलट महागाईने त्यांनी सर्वसामान्य लोकांना त्रस्त करून सोडले आहे. 2024च्या लोकसभा निवडणुकीचा संदर्भ देत अमिनुल इस्लाम म्हणाले, कर्नाटकमध्ये जे घडले, तेच देशात घडेल. आसाममध्ये लोकसभेच्या 14 पैकी 12 जागा जिंकण्याचा भाजपचा दावा फोल ठरेल.