Apple | India | Apple Store – ‘Apple‘ कंपनी भारतातील ऑफलाइन रिटेल नेटवर्क वाढवण्यासाठी मोठे पाऊल टाकत आहे. एकापाठोपाठ नवीन Apple Stores उघडत असलेल्या कंपनीकडून आता आणखी एका स्टोअरची घोषणा करण्यात आली आहे. डिसेंबर महिन्यात Apple देशात आपला पाचवा रिटेल स्टोअर सुरू करणार आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, 11 डिसेंबर 2025 रोजी नोएडामध्ये नवीन Apple Store सुरु होणार असून हा Apple चा या वर्षातील तिसरा आणि देशातील पाचवा अधिकृत स्टोअर असेल. नवीन स्टोअर ‘DLF Mall of India’, नोएडा येथे उघडले जाणार आहे. भारत हा जगातील दुसरा सर्वात मोठा स्मार्टफोन बाजार असल्याने Apple या बाजारपेठेत आक्रमक विस्तार धोरण राबवत आहे. पुढील वर्षी मुंबईत सुरू होणार आणखी एक स्टोअर : Moneycontrol च्या अहवालानुसार, Apple Retail च्या सीनियर व्हाइस प्रेसिडेंट Deirdre O’Brien यांनी नोएडा स्टोअरच्या उद्घाटनाबद्दल आनंद व्यक्त करताना सांगितले की, “भारतामध्ये आमच्या ग्राहकांकडून मिळणाऱ्या प्रतिसादावर आम्ही खूप आनंदी आहोत. आमचे विस्तार धोरण कायम ठेवत पुढील वर्षी मुंबईमध्ये आणखी एक Apple Store उघडण्याची योजना आहे. देशभरात असलेले आमचे पाच रिटेल स्टोअर्स, Apple Store Online आणि Apple Store App या सर्वांच्या मिळून भारतीय ग्राहकांना उत्पादन खरेदीचे अधिकाधिक पर्याय उपलब्ध होत आहेत.” Apple ने एप्रिल 2023 मध्ये भारतातील पहिले दोन स्टोअर्स सुरू केले होते आणि उद्घाटनाच्या पहिल्याच वर्षात या स्टोअर्सने जवळपास 800 कोटींचा महसूल कमावला. भारतामध्ये Apple चा मजबूत रिटेल नेटवर्क : प्रीमियम रीसेलर्स आणि मल्टी-ब्रँड रिटेल पार्टनर्सचे मोठे नेटवर्क आधीच अस्तित्वात असतानाही Apple आपली थेट रिटेल उपस्थिती वेगाने वाढवत आहे. यामुळे ब्रँडची पोहोच आणि प्रोडक्ट एक्सपीरियन्स दोन्ही अधिक मजबूत होत आहेत.