दुबई: आशिया चषक 2025 ला दमदार सुरुवात झाली असून, स्पर्धेतील पहिल्या सामन्यात अफगाणिस्तानने हाँगकाँगचा 94 धावांनी धुव्वा उडवला. आता दुसऱ्या सामन्यात भारत आणि संयुक्त अरब अमिराती (यूएई) हे संघ आमनेसामने येणार आहेत. भारतीय संघाचे नेतृत्व सूर्यकुमार यादव करत असून, तो पहिल्यांदाच मोठ्या स्पर्धेत कर्णधारपद भूषवणार आहे. भारताने याआधी यूएईविरुद्धच्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 9 गडी राखून विजय मिळवला होता. आता या दोन्ही संघांमध्ये दुसऱ्यांदा टी-20 सामना रंगणार आहे. दुबईच्या खेळपट्टीचा मूड आणि हवामानाचा अंदाज काय सांगतो, जाणून घ्या… पिच रिपोर्ट आणि हवामानाचा अंदाज दुबईच्या खेळपट्टीने याआधी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी दरम्यान फिरकी गोलंदाजांना चांगलीच साथ दिली होती. मात्र, यावेळी खेळपट्टीवर गवताचे प्रमाण जास्त असल्याने वेगवान गोलंदाजांना फायदा होऊ शकतो. हवामानाचा विचार करता, दुबईतील तापमान 42 अंश सेल्सियसपेक्षा जास्त असेल, परंतु सामन्याच्या वेळी ते 36 अंशांपर्यंत खाली येण्याची शक्यता आहे. यामुळे खेळाडूंना आणि प्रेक्षकांना उष्णतेचा त्रास सहन करावा लागू शकतो. नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. दुबईच्या मैदानाचा रेकॉर्ड एकूण सामने- ९३ प्रथम फलंदाजी करताना जिंकलेले सामने- ४६ सामने धावांचा पाठलाग करताना जिंकलेले सामने- ४७ सामने नाणेफेक जिंकून जिंकलेले सामने- ५३ सामने नाणेफेक गमावून जिंकलेले सामने- ४० सामने या मैदानावरील सर्वोच्च धावसंख्या- २ गडी बाद २१२ धावा सर्वात कमी धावसंख्या- ५५ सर्वात मोठ्या धावांचा यशस्वी पाठलाग-८ गडी बद १८४ धावा प्रथम फलंदाजी करताना सरासी धावसंख्या- १४५ धावा दोन्ही संघ भारत : सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, हर्षित राणा, रिंकू सिंग. यूएई: मुहम्मद वसीम (कर्णधार), अलीशन शराफू, आर्यांश शर्मा, आसिफ खान, ध्रुव पराशर, इथन डी’सूझा, हैदर अली, हर्षित कौशिक, जुनैद सिद्दीकी, मातीउल्लाह खान, मुहम्मद फारूक, मुहम्मद जवदुल्लाह, मुहम्मद झोहेब, राहुल चोप्रा, रोहीद खान, सिमरनजीत सिंग, सगीर खान. भारताचा दमदार संघ आणि अनुभवी खेळाडूंमुळे यूएईसमोर मोठे आव्हान आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ विजयी सलामी देण्यासाठी उत्सुक आहे. त्यामुळे या सामन्यात खेळपट्टी आणि हवामानाचा प्रभाव कोणत्या संघाला फायदा देईल, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.