Pune : भौतिकसह नैतिक प्रगती झाल्यास भारत विश्वगुरू

पुणे : विश्वगुरूत्व म्हणजे लौकिकार्थाने सत्ता स्थापन करणे नसून, सर्वसमावेशकतेचे धोरण अवलंबिणे आहे. जात-पात, धर्मभेद विसरून संतांच्या विचारसरणीनुसार समदृष्टीचा अवलंब करणे म्हणजे विश्वगुरूत्व होय, असे प्रतिपादन सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले.
संविधानानुसार प्रामाणिकपणे चालणे, चुकीच्या सवयी निपटून काढणे, स्वत:च्या घरापासूनच समाजप्रबोधनाचे श्रद्धापूर्वक आचरण करणे आणि संस्कृतीचे जतन करत पुढील पिढीसमोर आदर्श ठेवणे अपेक्षित आहे. भौतिक प्रगती होत असताना नैतिक प्रगती झाल्यास विश्वगुरू भारत ही केवळ घोषणा अथवा स्वप्न राहणार नाही तर येत्या 20 वर्षांत भारत विश्वगुरूपदाला पोहोचलेला दिसेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
सरसंघचालक डॉ. भागवत यांचे ”विश्वगुरू भारत’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. सहजीवन व्याख्यानमालेचे अध्यक्ष विनय कुलकर्णी, ग्लोबल स्ट्रॅटेजिक पॉलिसी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. अनंत भागवत मंचावर होते. व्याख्यानमालेचे यंदाचे २३ वे वर्ष आहे. व्याख्यानासाठी खास काश्मीरहून साजिद युसुफ शाह आणि राजौरी भागातील देशातील सर्वात युवा सरपंच सामरिन खान आले होते. सूत्रसंचालन रवींद्र खरे यांनी केले.
भारतीय प्राचीन, सनातन हिंदूराष्ट्राची उत्पत्ती धर्मतत्त्वातून, सत्त्यातून झाली आहे. सृष्टीचे विज्ञान जाणत जगाच्या कल्याणाची इच्छा ठेवून आपले राष्ट्र निर्माण झाले आहे. हाच इतिहास दडवला जात आहे. तो जगासमोरआणण्यासाठी आणि विश्वाचा समतोल साधण्यासाठी विश्वगुरुत्वाची आवश्यकता आहे. आज देश भौतिक प्रगती करत आहे. युवा पिढीच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवल्यास विश्वाचा स्वाभाविक गुरू हा भारतच होऊ शकेल, ही भविष्यवाणी नव्हे तर हा साधासोपा हिशेब आहे, असे डॉ. भागवत म्हणाले.
डॉ. भागवत म्हणाले…..
– सुख-सुविधा, प्रगत तंत्रज्ञानातून जग जवळ आले; परंतु मनामनातील अंतर मात्र वाढत गेले.
– पर्यावरणाचा मोठा ऱ्हास होत आहे. अन्न, जमीन, पाणी, हवा विषयुक्त होत आहे; ऋतु अनियमित आणि जमीन अस्थिर झाली आहे.
– प्रत्येकाचा अस्तित्वासाठी संघर्ष सुरू आहे; परंतु सृष्टीला जगवण्याचा विचार होत नाही.
– रा. स्व. संघाच्या शताब्दीनंतर सामाजिक पंचपरिवर्तन करण्याचा निर्धार केला आहे. ज्यात सामाजिक समरसता, कुटुंब प्रबोधन, पर्यावरण, नागरी शिष्टाचार आणि स्वदेशी यांचा समावेश आहे.





